Eknath shinde | ठाण्यात एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला धक्का
Eknath shinde | पुढच्यावर्षी राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी नेते, कार्यकर्त्यांच्या इनकमिंग आणि आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील जनाधार असलेल्या एका नेत्याने आता पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या 100 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
ठाणे (सुनील जाधव) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या बालेकिल्ल्यात एक धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपासोबत मिळून नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनन शिंदे गटात इनकमिंगच सुरु आहे. खासकरुन ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनाच एक धक्का बसलाल. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा पक्षाची साथ सोडणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हा धक्का शरद पवारांनी दिला आहे. पांडुरंग बरोरा हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 3 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह पांडुरंग बरोबर शरद पवार गटात प्रवेश करतील.
पांडुरंग बरोरा आणि कार्यकर्त्यांच्या 100 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेते दोन गट पडल्यानंतर 10 महिन्यांपूर्वी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता वर्ष राहिलेलं असताना त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांची पुन्हा घर वापसी झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. स्थानिक पातळीवर काय समीकरण बदलणार?
सध्या शहापूर विधानसभा मतदारसंघातून दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पांडुरंग बरोरा विरुद्ध दौलत दरोडा असं चित्र दिसू शकतं. शहापूरमधील बरोरा कुटुंब 1980 पासून शरद पवार यांच्यासोबत आहे.