3 पोलीस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, IG आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT, बदलापूर घटनेप्रकरणी गृहमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर

| Updated on: Aug 20, 2024 | 8:30 PM

बदलापुरातील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेची आणि पीडितेंना न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे.

3 पोलीस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, IG आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT, बदलापूर घटनेप्रकरणी गृहमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
बदलापूर घटनेप्रकरणी गृहमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
Follow us on

बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलीस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दुपारी आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.