‘पुढच्यावेळेला आम्हाला आतून लावा’, श्रीकांत शिंदे यांच्या फेविकॉलच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
"या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, फेविकॉलचा जोड आहे. पण पुढच्यावेळेला आम्हाला आतून लावा. नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच", असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला.
शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्याच्या कळ्यावत प्रचारसभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मिश्किल टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि शिट्ट्या वाजवण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी राज ठाकरे यांच्या शैलीत म्हणाले, “तोंडातली की कूकरची शिट्टी आहे? गप्प बस.” यानंतर राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत महत्त्वाचं आवाहन केलं. यानंतर त्यांनी दिवगंत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
“आज संध्याकाळपासून मला माहिती नाही, खोकला सुरु झाला. वातावरणच इतकं गढूळ झालेलं आहे. चुकून भाषणात खोकला आला तर कृपया मला माफ करा. आज या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, फेविकॉलचा जोड आहे. पण पुढच्यावेळेला आम्हाला आतून लावा. नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच”, असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरेंकडून आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा
“आज इथे ठाण्यात आल्यावर आनंद मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर सर्व जुने दिवस आठवायला लागले. माझे आणि आनंद दिघे यांचे एक वेगळ्याप्रकारचे मैत्रीचे संबंध होते. मी पूर्वी त्यांना सांगायचो, जेव्हा तिथे जायचो तेव्हा सांगायचा अहो स्वच्छ ठेवाओ. कुठे कुंकू पडलंय, कुठे काय, त्याच्यातच झोपायचे. आज गेलो तर लक्षातच आलं नाही की मी याच वास्तूत आलोय. त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणे फिरताना मजा यायची. तेव्हा ठाणं टुमदार होतं. मी लहानपणी बाळासाहेबांबरोबर किती वेळा आलो. तेव्हा रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सभा चालायच्या. त्यावेळी व्यासपीठं एवढे मोठे नसायची”, असं राज ठाकरे म्हणाले.
“कोणी एकेकाळी नाही. ३० ते ३५ वर्षाचा काळ असेल. पण अशी टुमदार शहरं उभी राहिली पाहिजे. हा ठाणे जिल्हा देशातील… मी काय बोलतो ते लक्षात ठेवा. ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभेची संयुक्त सभा आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतो आज वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत. तुम्ही कितीहा काम करा, कितीही रस्ते बांधा, पूल बांधा. तुम्ही बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तुम्ही कितीही विकास केला तरी या शहरात काही घडणार नाही. खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हस्के यांनी कितीही फंड आणले तरी… मी फक्त ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतो. सर्व बाहेरून लोकं येत आहेत. सर्वांत जास्त प्रमाण ठाणे जिल्ह्यात आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.