राज ठाकरे भेटले लढवय्या कार्यकर्त्यांना, उपोषणस्थळी जाऊन विचारपूस; उपोषण कशासाठी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद नगर जकात नाका येथे आले होते. यावेळी त्यांनी टोल दरवाढी विरोधात उपोषण करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 8 ऑक्टोबर 2023 : मुंबईतील एन्ट्री पॉईंटवर असलेल्या पाचही टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं मुंबईत येणं महागलं आहे. खळखट्ट्याक करणाऱ्या मनसेने या टोल दरवाढीविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणादरम्यान जाधव यांनी प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मनसे अधय्क्ष राज ठाकरे यांनी उपोषण स्थळी येऊन सर्व उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्यासोबत होते.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाआनंद नगर जकात नाका येथे गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे . ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी अद्याप मनसेच्या उपोषणस्थळाला भेट दिलेली नाहीये. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. आज चौथ्या दिवशी अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा बीपी कमी झाला आहे. शुगरची लेव्हलही कमी झाली आहे. जाधव यांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण जाधव यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांच्यासोबत मनसेचे असंख्या कार्यकर्तेही उपोषण करत आहेत.
राज ठाकरे यांच्याकडून विचारपूस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आनंद नगर जकात नाका येथे येऊन अविनाश जाधव यांची विचारपूस केली. त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारणा केली. इतर उपोषणकर्त्यांशीही संवाद साधला. तसेच उपोषणकर्त्यांकडून माहितीही घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आलं. राज ठाकरे अर्धा तासहून अधिकवेळ या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत अमित ठाकरेही होते. उपोषणस्थळी असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. यात महिलांचा समावेश अधिक होता.
तर भगतसिंग यांचा मार्ग पत्करू
यावेळी अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. गेल्या 4 दिवसांपासून आम्ही इथे टोल दरवाढीविरोधात उपोषण करत आहोत. गांधी सप्ताह होता म्हणून आम्ही गांधीवादी मार्गाने उपोषण करत आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्यास उद्या आम्ही भगतसिंग यांच्या मार्गानेही जाऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. आज गांधीवादाच्या मार्गाने मुद्दामही जात आहोत. उद्या कोणी म्हणू नये की, मनसे नेहमीच आक्रमक होते. पण यांना शांततेची भाषा कळत नाही. या पुढे भगतसिंग यांचा पर्याय आम्ही घेऊ, असं ते म्हणाले.
नंतर याचिका मागे घेतली
अधिकारी फक्त येऊन भेटून गेले. पण अधिकारी थोडीच निर्णय करतात. आताचे ठाण्याचे मुख्यमंत्री जेव्हा आमदार होते तेव्हा तेच या टोलनाक्याच्या विरोधात होते. मग ते PWD मिनिस्टर झाले आणि त्यांचा विरोध आणि कोर्टात या टोलनाक्यावर टाकलेली याचिका त्यांनी मागे घेतली, असा दावा त्यांनी केला.