Ambernath Dumping : अंबरनाथच्या डम्पिंगची मनसे आमदार करणार पाहणी, रहिवाशांच्या बाजूने उभं राहण्याची राजू पाटलांची भूमिका
अंबरनाथचं हे डम्पिंग ग्राऊंड तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आल्याचं पालिकेनं आधी सांगितलं होतं. मात्र आता वर्ष उलटूनही हे डम्पिंग बंद होत नसल्यानं स्थानिकांचा त्रास वाढत चालला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली परिसरात अंबरनाथ पालिकेनं सुरू केलेल्या डम्पिंग (Dumping)चा स्थानिकांना मोठा त्रास होत आहे. या डम्पिंगची मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) हे पाहणी (Inspections) करणार आहे. त्यामुळं रहिवाशांच्या विरोधाला आता मोठं बळ मिळणार आहे. अंबरनाथचं हे डम्पिंग ग्राऊंड तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आल्याचं पालिकेनं आधी सांगितलं होतं. मात्र आता वर्ष उलटूनही हे डम्पिंग बंद होत नसल्यानं स्थानिकांचा त्रास वाढत चालला आहे. या डम्पिंगविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, आता खुद्द मनसेचे आमदार नागरिकांच्या बाजूने उतरले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या या लढ्याला नक्कीच बळ मिळू शकेल.
हरित लवादाने या डम्पिंगची केली होती पाहणी
अंबरनाथच्या मोरीवली पाड्याजवळ असलेलं अनधिकृत डम्पिंग बंद करून पालिकेनं वर्षभरापूर्वी चिखलोली परिसरातील आरक्षित भूखंडावर कचरा टाकायला सुरुवात केली. मात्र हा भूखंड रहिवासी भागाला अगदी लागून असल्यानं स्थानिकांना त्याचा मोठा त्रास होतोय. पावसामुळे डम्पिंगमधून निघणारं घाण पाणी थेट इमारतींच्या बोअरवेलमध्ये जातंय. त्यामुळं दुर्गंधीसोबतच या भागात आजारही बळावले आहेत. याबाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी करूनही काहीच तोडगा निघत नसल्यानं स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर हरित लवादाने या डम्पिंगची पाहणी केली होती. आता थेट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या समस्येची दखल घेतली आहे. हा विषय आपल्या कानावर आला असून येत्या 2-3 दिवसात या डम्पिंगची आपण पाहणी करणार असल्याचं राजू पाटील यांनी जाहीर केलंय. तसंच या डम्पिंगला जर स्थानिकांचा विरोध असेल, तर आपण स्थानिकांच्या बाजूने उभे राहू, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता स्थानिकांच्या डम्पिंग विरोधी लढ्याला मोठं बळ मिळणार आहे. (MNS MLA Raju Patil will inspect the dumping of Ambernath)


