अरे देवा! राज ठाकरे समजून मनसे कार्यकर्त्यांकडून चुकून भाजप मंत्र्याचं जंगी स्वागत, नेमकं काय घडलं?
गाडीचा सायरनचा आवाज येताच राज ठाकरे आले असे वाटल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून घोषणाबाजी करत स्वागत केले. मात्र गाडी फटाके वाजून गाडी थांबली नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केला. त्यानंतर थोड्या वेळाने संबंधित ताफा नेमका कुणाचा होता याचा अंदाज कार्यकर्त्यांना आला.
सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 23 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहराच्या दौऱ्यावर आहेत. खरंतर त्यांचा हा दोन दिवसांचा विशेष दौरा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे. मनसेकडून कल्याण पश्चिम येथील स्प्रिंग टाईम क्लब हॉटेलमध्ये भिवंडी लोकसभेतील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरे स्वत: सर्व आढावा घेणार होते. त्यामुळे कार्यकर्ते सतर्क होते. कार्यकर्त्यांकडून संपूर्ण तयारी करण्यात आली. ते तयारीत होते. त्यांचा उत्साह असणं साहजिक आहे. कल्याण शहरात राज ठाकरे येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात येत होती. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार होती. पण कार्यकर्त्यांकडून उत्साहात राज ठाकरे येण्यापूर्वीच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांना जेव्हा समजलं की संबंधित गाडी राज ठाकरे यांची नसून कपिल पाटील यांची आहे तेव्हा कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
राज ठाकरे आज सायंकाळी चार वाजता कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी कल्याणच्या दुर्गाडी चौकात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तयारी केली होती. या तयारीत राज ठाकरे यांची गाडी आली तर फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले जाणार होते. मात्र याच वेळेला रस्त्यावरून सायरन वाजवत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची गाडी आली. कार्यकर्त्यांना वाटले ही गाडी राज ठाकरे यांचीच आहे. उत्साहात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती फटाके वाजवून स्वागत सुरू केले. मात्र केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची गाडी न थांबता पुढे गेली.
…आणि दुर्गाडी चौकात एकच हशा पिकला
गाडी पुढे जाताच कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त करत वाहतूक पोलिसांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांना माहिती मिळाली की संबंधित गाडी ही राज ठाकरे यांची नसून कपिल पाटील यांची होती. संबंधित माहिती मिळाल्यानंतर आता राज ठाकरे येतील फटाके कसे वाजवायचे? या विचाराने कार्यकर्त्यांनी पुन्हा धावपळ उडाली. कार्यकर्त्यांनी शिताफीने दहा मिनिटाच्या आत फटाक्यांची माळ आणून रस्त्यावर लावली. त्यानंतर पाच वाजता राज ठाकरे हे कल्याणमध्ये दाखल झाले. त्यावेळेला कार्यकर्त्यांनी हे फटाके वाजवून त्यांचं जंगी स्वागत केलं. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यासमोर उत्साही कार्यकर्त्यांनी वाजवलेल्या फटाक्यामुळे त्या परिसरामध्ये एकच हशा पिकला.