ठाणे | 13 ऑगस्ट 2023 : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात मृत्यूचं तांडव. एकाच रात्रीत मोठ्या प्रमाणवर लोक दगावले आहेत. एकूण 17 रुग्ण दगावल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णालयाच्या अधिष्ठात्याला घेराव घालून जाब विचारला. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? असा संतप्त सवाल करण्यात आला. त्यावर डॉक्टरांनी या रुग्णांची माहिती दिली आहे. तर, मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकूण 18 रुग्ण दगावले आहेत. अत्यंत अस्वस्थ कंडिशनमध्ये रुग्ण रुग्णालयात येत असतात. त्यामुळे हा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका डॉक्टराने दिली.
मृतांपैकी पाच रुग्णांना श्वासाचा त्रास होता. एका पेशंटच्या सहा हजार प्लेट्सलेट कमी झाल्या होत्या. रुग्णालयात आल्यावर एका मिनिटात त्याचा मृत्यू झाला. एका पेशंटचा आतड्यातील अल्सर फुटला होता. त्याचे हार्टही चालत नव्हते. व्हेंटिलेटर लावून त्याच्यावर उपचार करण्यात आले. दोन पेशंटचे यकृत फेल गेले होते. एकाची किडनी फेल गेली होती.
डायबेटीस हायपर टेन्शनचे दोन पेशंट होते, अशी माहिती या डॉक्टरने दिली. या रुग्णालयात 20 बेड होते. आता 48 बेड सुरू आहेत. उल्हानसगर, कल्याण, अंबरनाथहून रुग्ण येतात. माझ्याकडे पेशंट आल्यावर मी ट्रिट करतो. आयसीयूत नेतो. कुणालाही नाकारलं जात नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिव्हिल रुग्णालयाचं काम सुरू आहे. त्यामुळे शिवाजी रुग्णालयावर ताण येत आहे. या रुग्णालयात 16 रुग्ण दगावल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या वयाची ही रुग्ण आहेत. त्यांच्या मृत्यूची कारणंही वेगवेगळी आहेत. याबाबत मी पालिका आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कशामुळे रुग्ण दगावले? काही त्रुटी होती का? याची माहिती घेण्यात येणार आहे. 500 बेडचं हे हॉस्पिटल आहे. पण रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, असं असलं तरी 16 लोक दगावले हे योग्य झालं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.