मुंब्र्यात हायव्होल्टेज हालचाली, पोलीस बॅकफूटला, उद्धव ठाकरे येणारच, काय घडतंय?

| Updated on: Nov 11, 2023 | 3:30 PM

उद्धव ठाकरे मुंब्र्यात आज संध्याकाळी दाखल होणार आहेत. मुंब्र्यात पाडण्यात आलेल्या शाखेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत. तिथे जावून ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पण दुसरीकडे या शाखेच्या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते तिथे ठाण मांडून आहेत. त्यामुळे पुढच्या दोन तासातल्या घटना अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत.

मुंब्र्यात हायव्होल्टेज हालचाली, पोलीस बॅकफूटला, उद्धव ठाकरे येणारच, काय घडतंय?
Follow us on

ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत. ठाकरे गटाच्या मुंब्रा शहरातील एक शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. पण त्यांच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात अतिशय हालव्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जी शाखा पाडण्यात आली ती शाखा आपलीच होती, असा दावा शिंदे गटाचा आहे. तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या शाखेवर दावा करत आहेत.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावले होते. पण रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन काही लोकांनी ते बॅनर फाडले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात शाखा परिसरात येण्यास मनाई केल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात कलम 144 ची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर हीच नोटीस पोलिसांनी रद्द केल्याची माहिती समोर आली.

उद्धव ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार?

पोलीस उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात अडवणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मुंब्र्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अडवणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या शक्तीप्रदर्शनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुंब्र्यात येऊन काय बोलतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंब्र्यात आज तब्बल 500 फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप

पोलिसांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेली कलम 144 ची नोटीस रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. “मी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच अभिनंदन करतो की त्यांनी 144 ची नोटीस मागे घेतली. माजी मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत 144 ची नोटीस कोणी दिली आहे का? पोलीस मुंब्र्यामध्ये घबराटीच वातावरण तयार करत आहेत. उद्धव ठाकरे हे मुंब्रामध्ये आले असते आणि गेले असते. पण यांनी गेल्या 12 तासांपासून हा मुद्दा मोठा केला आहे. काही गरज नसताना हा मुद्दा मोठा केला आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

“ती शाखा गेल्या 40 वर्षांपूर्वीची आहे. ती शाखा इतक्या तत्पपरतेने का तोडण्यात आली? ती जागा गोचरणची आहे आणि त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे . त्याठिकाणी आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून अनधिकृत बांधकाम सुरू आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनती आहे की तुमच्या नावाने जे काही सुरु आहे त्यावर लक्ष द्यावं”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.