Ulhasnagar Crime: उल्हासनगरात कौटुंबिक वादातून एकाची हत्या, मुख्य आरोपी फरार तर दोन महिला आरोपींना अटक
रवि आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप वाद सुरु होते. या वादाला कंटाळून रविची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. याबद्दल तिला मुलगी मानणाऱ्या आनंद शेट्टी यांनी सुनेला नीट का वागवत नाही याचा जाब रवि याच्या आईला विचारला.
उल्हासनगर : कौटुंबिक वादातून एका इसमाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये रविवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या असून दोन मुख्य आरोपी फरार आहेत. आनंद श्रीहरी तेलगू उर्फ शेट्टी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रवि गाजंगे आणि जफार अशी मुख्य आरोपींची नावे असून दोघेही फरार आहेत.
कौटुंबिक वादातून हत्या
मयत आनंद शेट्टी हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रवि गाजंगे याच्या पत्नीला मुलगी मानत होता. रवि आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप वाद सुरु होते. या वादाला कंटाळून रविची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. याबद्दल तिला मुलगी मानणाऱ्या आनंद शेट्टी यांनी सुनेला नीट का वागवत नाही याचा जाब रवि याच्या आईला विचारला. तसेच शेट्टी यांनी रविच्या आईला शिवीगाळही केली. याचाच राग आल्याने रवि गाजंगे याने आई आणि अन्य साथीदारांसोबत मिळून आनंद शेट्टीचा काटा काढला.
फरार रवि गाजंगे आणि जाफर रेकॉर्डवरील गुन्हेगार
रवि गाजंगे, त्याची आई, रविचा साथीदार जाफर आणि अन्य एक महिला या सर्वांनी रविवारी रात्री आनंद शेट्टीला उल्हासनगर कँप 3 मधील रेल्वे स्थानक परिसरात गाठले. त्यानंतर या सर्वांनी शेट्टी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली. दरम्यान हत्या केल्यानंतर रवि गाजंगे आणि जाफर दोघेही घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी रविची आई आणि हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या त्या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
तर फरार रवि गाजंगे आणि जाफर या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. रवी गाजंगे आणि जाफर हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना यापूर्वी तडीपार देखील करण्यात आल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. (Murder of a man in a family dispute in Ulhasnagar, two women accuse arrested)
इतर बातम्या