‘कल्याण-डोंबिवली’साठी शिंदे गट-भाजपचे दोन नेते समोरासमोर; निवडणुकीपूर्वीच धुसफूस, तणातणी सुरू
आज आपण टीका करत आहात.मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यावेळीची परिस्थिती, ते वातावरण, तेव्हाचा इतिहास आपण तपासला किंवा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलात तर अशी विधाने होणार नाहीत.
ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपचे दोन नेते समोरा समोर आले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी गल्लीतल्या नेत्यांनी मर्यादा संभाळून बोलावं, असा खोचक सल्ला संजय केळकर यांना दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा मतदारसंघावरून धुसफूस सुरू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. तर लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याचा हा वाद विकोपाला जाणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं आलेलं सरकार, मागील 10 महिन्यांपासून आलेली सत्ता बहुतेक केळकरांना पटलेलं दिसत नाहीये. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येत, असा टोला लगावतानाच केळकरांचं बोलण एवढं सीरियसली घेण्याची गरज नाही, असं नरेश म्हस्के म्हणाले.
इतरांना महत्त्व द्यायची गरज नाही
भाजप आणि शिंदे गटाची युती आहे हे कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इतरांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. आजचं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी नेते आहेत, हिंदुत्वाचा विचार मांडणारे नेते आहेत, असं सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे हिंदुत्वाच सरकार हवं होत तेच राज्यात आहे. म्हणूनच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असं फडणवीस यांनी सांगितल्याचंही म्हस्के म्हणाले.
सत्तेचे फायदे सर्वांनाच
ज्येष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायल्या पाहिजे. तसेच त्या मर्यादा सांभाळून आपल्याला बोलायला पाहिजे. आज सत्तेचे फायदे अनेकांना झालेले आहेत. रविंद्र चव्हाण बांधकाम मंत्री झालेले आहेत. शिवसेना असेल, भाजपा असेल सगळ्यांनाचं सत्तेचा फायदा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सर्वांना ताकद माहीत आहे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदार आहेत. हजारो करोडो रुपयांची काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत. रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केलं? तरुण मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं वाईट वाटून घ्यायची गरज नाही. निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष आम्ही एकत्र येऊन काम करत असतो. दोन्ही पक्षांची ताकद असते. ठाणे, कल्याण, पालघर कोणाची ताकद होती हे सगळ्यांना माहीत आहे, असा चिमटा त्यांनी काढला.