ठाणे | 13 ऑगस्ट 2023 : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षरश: मृत्यूचं तांडव झालं आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्ण दगावले आहेत. दोन दिवस आधीच या रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर आता 18 रुग्ण दगावल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमुळे मृतांचे नातेवाईक संतापले असून हवालदिल झाले आहेत. मनसे आणि ठाकरे गटाने या रुग्णालयात जाऊन डीनला घेराव घालून जाब विचारला. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला. बेशरमपणाची हद्द झाली. माझ्या हातात अधिकार असते तर डीनचे कानशील लाल केले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली. त्यानंतर आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधला. बेशरम पणाची हद्द आहे. पाच मृत्यूनंतरही काळजी घेतली नाही. आम्ही येऊन फक्त बडबडून गेलो. प्रशासनावर पालिकेचा हक्क असतो. प्रशासनाला काही कळत नाही. माळगावकर चांगला माणूस आहे. पण त्याला डोकं नाही. नको त्यांना त्यांनी रुग्णालयात आणून ठेवलं आहे. दरिद्री आहे हॉस्पिटलची, अशी संतप्त भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
17 मृत्यूंची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. जाब द्यावाच लागेल. गोरगरिबांचा हा पट्टा आहे. वाडा, मोखाडा आणि पालघर या पट्ट्यातून आदिवासी लोक उपचारासाठी येतात. गरीब असतात. त्यांचं जेवणही प्रशासन खातं. इथे खायला दोन अंडी दिली पाहिजे. प्रथिने दिले पाहिजे. काही देत नाही. वाडग्यात भात आणि डाळ देतात, असं आव्हाड म्हणाले.
लोकं सीरिअस झाल्यावरच येतात. नाही तर घरी राहिले असते. रुग्णालय प्रशासन उगाच काहीही कारणं देत आहे. पालिकेचं रुग्णालयाकडे लक्षच नाही, असं सांगतानाच या रुग्णालयात जाण्यासाठी मोठा दरवाजा आहे. पण आतमधून बाहेर येण्याचा फक्त वरती रस्ता आहे. म्हणून लोक वर जात आहेत. बेशरम प्रशासन आहे. हॉस्पिटलमध्ये नर्स. डॉक्टर कमी आहेत. याची जबाबदारी कोणी स्वीकारणार की नाही? ठाणे प्रशासनाला जाग येतच नाही. फक्त रंगरंगोटी लाईट यावरच भर आहे. बिलं काढण्यावर भर आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. भाग्य आहे. पण हृदयात थोडीशी ममत्व, माया, आपुलकी, गरीबाबद्दल कणव असायला हवं. पाच मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यायला हवी होती. त्यांचं हे शहर आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. आम्ही एका फोनवर इथे आलो. प्रशासनाची चावी कुणाच्या हाती आहे? माझ्या हाती असती तर डीनचं कानशील लाल केलं असतं. डीनच्या चेहऱ्यावरच्या रेषाही हालत नाहीत. लोक मेले आहेत. जिवंत पेशंट बाजूला झोपले. मेलेला पेशंटमध्ये झोपला कसं वाटेल? असा सवाल त्यांनी केला.
भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना क्लेशकारक आणि दु:खदायक आहे. एकाच रात्रीत एवढे मृत्यू झाले नाहीत. वेगवेगळ्या वेळी ही घटना घडली आहे. सिव्हील हॉस्पिटल फूल फ्लेज सुरू नाही. त्यामुळे रुग्णालयावर ताण आला. या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णही धाव घेत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करायला जागा नाही. प्रश्न असले तरी त्यावर मात करणं गरजेचं आहे. डीपीडीच्या मिटिंगमध्ये हा मुद्दा उचलला होता. पण काही झालं नाही, असं आमदार संजय केळकर म्हणाले.