‘उद्या आमचं सरकार आल्यास पोलिसांना भोगावं लागेल’, राष्ट्रवादीचे मेहबूब शेख भडकले
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय. ते शरद युवा संवाद यात्रेसाठी आज उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. तसेच उद्या आमचं सरकार आलं, तर पोलीस अधिकाऱ्यांना हे सगळं भोगावं लागेल, असा इशाराही मेहबूब शेख यांनी दिला.
“केंद्रात जसं ईडी, सीबीआय, एनसीबी लावलं जातं, तसं खासकरून ठाणे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जातोय. खासकरुन आमच्या उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांना एमपीडीए, तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. पोलीस संरक्षण काढून घेतलं जातंय”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला.
“आमच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून ब्लॅकमेल करून आमच्या पक्षात या, असं सांगितलं जातंय”, असं मेहबूब शेख म्हणाले.
“हे जे काही दादागिरीचं वातावरण चाललंय, याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भीक घालणार नाहीत. अधिकाऱ्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे सरकार किंवा एक सरकार काही आयुष्यभर नसतं. अशा पद्धतीने कुणी चुकीचं काम केलं, तर उद्याच्या काळात त्यांना हे सगळं भोगावं लागेल”, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
“हे सरकार ३१ डिसेंबरच्या पुढचा दिवस बघणार नाही”, असा दावा मेहबूब शेख यांनी केला.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची शरद युवा संवाद यात्रा सुरू असतानाच ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची बातमी आली. त्यामुळे मेहबूब शेख यांनी या अटकेचा निषेध करत सरकारवर निशाणा साधला.
“ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला जातो, त्या त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा विरोध करतो. मग ते जेम्स लेनचं पुस्तक असो, किंवा हर हर महादेव चित्रपट असो..”, असं मेहबूब शेख म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेवर कुणी घाला घालायचा प्रयत्न करत असेल, आमच्या अस्मितेचा चुकीचा इतिहास जर कुणी दाखवत असेल तर त्याला विरोध होणारच, असंही मेहबूब शेख म्हणाले.
“आव्हाड साहेबांना आज जेलमध्ये घातलंय. आज हे हुकूमशाही सरकार आहे, यांना वाटत असेल की आव्हाड साहेबांना जेलमध्ये घातलं म्हणून हे आता आमचा आवाज दाबतील, पण आव्हाड साहेब आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता देखील अशा भीतीला आम्ही भीक घालत नाही”, असा घणाघात त्यांनी केला.
“याचा आम्ही राज्यभर निषेध करू, रस्त्यावर येऊन निषेध करू. सरकारनं तातडीनं आव्हाड साहेबांना सोडलं पाहिजे, कारण आव्हाड साहेबांनी काही गुन्हा केला नाही. जर आज यांनी आव्हाड साहेबांना सोडलं नाही, उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस संपूर्ण राज्यामध्ये या सरकारचा निषेध करेल”, असा इशारा मेहबूब शेख यांनी दिला.