जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तर? राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन ठरला, पडद्यामागे घडामोडींना वेग
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक झाली तरी पूर्ण ताकदनीशी ठाणे महापालिका निवडणूक (TMC Election) लढायची, असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या (Thane Municipal Election) पार्श्वभूमीवर ठाण्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज मोठा दावा केलाय. आपल्याला कधीही अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आपल्याला केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत आज चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरी पूर्ण ताकदनीशी ठाणे महापालिका निवडणूक लढायची, असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ठाण्याच्या नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
“आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षातील नगरसेवकांना फोडण्यासाठी वेगवेगळी आश्वासने शिंदे गटाकडून देण्यात येतील. मात्र या आव्हानांना नगरसेवकांनी बळी पडू नये”, असं आवाहन या बैठकीत करण्यात आलंय.
“या निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय आपल्याला ही निवडणूक पार पाडायची आहे”, अशी चर्चा या बैठकीत झाली.
“सध्या जितेंद्र आव्हाड यासोबतच आनंद परांजपे यांना पोलिसी कारवायात अडकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही”, असा निश्चय या बैठकीत झाल्याची माहिती समोर आलीय.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमका काय दावा काय केलाय?
‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली . जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
“मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.