Ulhasnagar Crime : गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात, केबल व्यावसायिक हत्या प्रकरणात घेतला ताबा
या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण 12 जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुरेश पुजारी 15 वर्षांपासून परदेशात बसून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. 2021 साली फिलिपाईन्स देशात त्याला अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आलं.
उल्हासनगर : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी (Suresh Pujari) याचा उल्हासनगर पोलिसांनी ताबा (Detained) घेतला आहे. साल 2015 सालच्या केबल व्यावसायिक सच्चू कारीरा हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पुजारीला उल्हासनगरला आणण्यात आलंय. उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे स्वतः या प्रकरणाचा तपास करणार आहेत. उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चानंद उर्फ सच्चू कारीरा यांच्यावर 11 सप्टेंबर 2015 रोजी गोलमैदान परिसरातील त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात कारीरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी स्वतः सुरेश पुजारी यानं न्यूज चॅनेल्सना फोन करून स्वीकारली होती. (Notorious gangster Suresh Pujari in Ulhasnagar police custody in murder and ransom case)
सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः करणार पुजारीची चौकशी
या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण 12 जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुरेश पुजारी 15 वर्षांपासून परदेशात बसून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. 2021 साली फिलिपाईन्स देशात त्याला अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात त्याच्याविरोधात दाखल असलेल्या 24 गुन्ह्यांचा क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. यापैकी 15 गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतले, 7 गुन्हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतले, तर प्रत्येकी एक गुन्हा हा नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आहे. यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याचा ताबा मिळावा यासाठी विशेष मोक्का न्यायालयात अर्ज करून सुरेश पुजारीचा ताबा घेतला. त्याला गुरुवारी 14 एप्रिल रोजी उल्हासनगरात आणण्यात आलं असून त्याची सच्चानंद करीरा हत्या प्रकरणात स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे चौकशी करणार आहेत.
अनेक राजकारणी आणि उद्योगपतींना खंडणीसाठी दिल्या होत्या
सुरेश पुजारी हा पूर्वी गँगस्टर रवी पुजारीच्या टोळीत काम करत होता. मात्र 2011 साली त्याने रवी पुजारीपासून फारकत घेत स्वतःची गॅंग सुरू केली. यानंतर त्याने ठाणे जिल्ह्यात दहशत माजवायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादीचे सध्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार गणपत गायकवाड, पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्यासह अनेक राजकारणी, व्यापारी, बिल्डर यांना पुजारी याने खंडणीसाठी फोन करून धमक्या दिल्या होत्या. तर काही ठिकाणी त्याने गोळीबारही केला होता. अखेर त्याला अटक झाल्यानंतर हे धमक्यांचं सत्र थांबलं आहे. आता सच्चानंद कारीरा हत्याप्रकरण आणि इतर धमक्यांच्या प्रकरणात सुरेश पुजारी पोलिसांना काय माहिती देतो? हे पाहावं लागणार आहे. (Notorious gangster Suresh Pujari in Ulhasnagar police custody in murder and ransom case)
इतर बातम्या
Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Pune Crime : कात्रज दरीत आढळला जळालेल्या अवस्थेतला तरुणाचा मृतदेह