OBC Reservation : ओबीसी गणना रद्द करुन ठामपावर अवमान याचिका दाखल करा, ओबीसी एकीकरण समितीची मागणी
ठाणे शहर हे पाच पाखाड्या आणि काही गावांचे बनले आहे. ठाणे शहरातील या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसींची संख्या आहे. शिवाय, ठाणे हे महानगराच्या श्रेणीत असल्याने परजिल्ह्यातील स्थलांतरीतांचीही (ठाणेकर मतदार) संख्या मोठी आहे. त्यामुळे आमचे अंदाजानुसार ठाणे शहरात किमान 25 टक्क्यांच्या आसपास ओबीसींचे वास्तव्य आहे.
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी जाती समूहांना राजकीय आरक्षण (Reservation) देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर ठाणे शहरात सर्व्हेक्षण (Survey) करण्यात आले होते. हे सर्व्हेक्षण बोगस पद्धतीने करण्यात आले असून एकाही घरात थेट संपर्क न साधता जागेवर बसून आकडेवारी तयार केली आहे, असा आरोप करीत ठाणे पालिकेने सादर केलेली ओबीसींची आकडेवारी रद्द करुन नव्याने गणना करावी आणि ठामपाविरोधात अवमान याचिका (Contempt Petition) दाखल करावी, अशी मागणी ठाणे ओबीसी एकीकरण समितीने केली आहे. या संदर्भात ओबीसी नेते प्रफुल वाघोले यांनी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांना निवेदन दिले आहे.
ठाणे शहरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसींची संख्या
निवेदनानुसार, ठाणे महानगर पालिकेच्या वतीने हा सर्व्हे घरोघरी जाऊन केला असल्याचे सांगितले. अनेकांच्या घरी ठाणे महानगर पालिकेचे ओबीसी गणक पोहचलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही, ठाणे महानगर पालिकेने ठाणे शहरात 15 टक्के ओबीसी असल्याचे आपल्या अहवालात नमूद करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे शहर हे पाच पाखाड्या आणि काही गावांचे बनले आहे. ठाणे शहरातील या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसींची संख्या आहे. शिवाय, ठाणे हे महानगराच्या श्रेणीत असल्याने परजिल्ह्यातील स्थलांतरीतांचीही (ठाणेकर मतदार) संख्या मोठी आहे. त्यामुळे आमचे अंदाजानुसार ठाणे शहरात किमान 25 टक्क्यांच्या आसपास ओबीसींचे वास्तव्य आहे. मात्र, घाईघाईत आणि काम संपविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली ओबीसी गणना ही फसवी तर आहेच; शिवाय सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती देऊन न्यायालयाचीही बेअदबी करण्याचा प्रयत्न ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे पालिकेवर अवमानाना याचिका दाखल करावी, अशी मागणी केली आहे. (OBC Integration Committee demands cancellation of OBC count and filing of contempt petition on TMC)