ठाणे : एकीकडे लोकांना कोरोनाची लस मिळत नाही आहे तर दुसरीकडे ठाण्यात एकाच महिलेला एकाच वेळी तीन डोस देण्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्राकर हा अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस देण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून पालिका डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आलं आहे. आरोग्य केंद्रावरच्या अशा निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तर याबाबत समिती नेमली असून आम्ही चौकशी करत आहोत, असे पालिका प्रशासनाने उत्तर देत आहे (one woman given three times dose of covid vaccine in Thane).
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या आनंदनगर आरोग्य केंद्रावर 25 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. लस घेण्यासाठी ब्राम्हड येथे राहणारी एक महिला या आरोग्य केंद्रावर गेली. याचवेळी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला तब्बल एक नव्हे तर तीनदा लस दिली. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली आणि घरी आली (one woman given three times dose of covid vaccine in Thane).
आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर स्थानिक नगरसेविकेला हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले. पण त्याच्याकडून त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. त्यामुळे ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप पक्षाकडून करण्यात आला. या सर्व प्रकाराला सत्ताधारी आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे, असे आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
दरम्यान या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले. तरीही यासाठी एक कमिटी नेमली जाईल आणि चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांनी यावर राजकारण करू नये, असाही टोला त्यांनी लगावला.
लसीचे तीन डोस देण्यात आले असताना देखील पालिका प्रशासन तोंडावर बोट ठेवत आहे. मात्र या प्रकारामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल