ठाणे : पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा रेल्वेची हाराकिरी सुरू झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा झाला आहे. अंबरनाथमध्ये यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यास रेल्वे पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलीस आणि प्रवासी यांच्यात वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऐन गर्दीच्यावेळी ज्यादा लोकल सोडल्या जात नाहीत. त्यातच पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. आणि आता यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्येही बसण्यास मनाई करण्यात येत असल्याने प्रवाशांचा पाराच चढला. या संतप्त प्रवाशांनी अंबरनाथमध्ये लोकल रोखून धरल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील यार्डातून सकाळी 7.51 मिनिटाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी फास्ट लोकल सुटते. ही लोकल स्टेशनला येण्यापूर्वी यार्डातूनच अनेक प्रवासी लोकलमध्ये बसून जागा अडवून ठेवतात. त्यामुळं प्लेटफॉर्मवरून लोकल पकडणाऱ्यांना जागा मिळत नसल्याची तक्रार आल्याने रेल्वे पोलिसांनी काल यार्डात जाऊन प्रवाशांना लोकलमधून उतरवलं. त्यामुळं या प्रवाशांनी 10 मिनिटं लोकल अडवून ठेवली. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केल्यानं प्रवासी आणि रेल्वे पोलीस यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आणि प्रवाशांनी पुन्हा लोकल अडवून धरली.
यार्डातून सुटणाऱ्या प्रवाशांना उतरवता, मग अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकातून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई का करत नाही? असा सवाल या प्रवाशांनी केला. प्रवाशांनी अंबरनाथ लोकल रोखून धरत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पावसाची रिमझिम आणि प्रवाशांचं आंदोलन यामुळे अंबरनाथ स्टेशनमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. लोकल रोखून धरल्याने रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दीही झाली होती. त्यामुळे रेल्वे पोलीसही आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच प्रवासी बाजूला झाले, मात्र यानंतर उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, आजच्या प्रमाणे कालही लोकल लेट होत्या. काल संध्याकाळी वाशिंद स्थानकादरम्यान सिग्नल बिघाड झाल्याने कल्याणवरून कसाऱ्याकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे कामावरून परतत असणाऱ्या चाकरमान्यांना एक एक तास ट्रेनमध्ये उभा राहून प्रवास करावा लागत होता. लोकल लेट झाल्याने प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. तब्बल एक तासानंतर ही लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली.
काल सायंकाळी 6.35 च्या दरम्यान वासिंद स्थानकामधील सिंगल क्रमांक 102 यामध्ये बिघाड झाल्याने कल्याणवरून कसारा कडे जाणाऱ्या रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून 6:52 ला ही तांत्रिक बिघाड दूर केली. मात्र या कालावधीत कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनची एकामागे एक अशी रांगाचरांग लागली होती. त्यातच टिटवाळा स्थानका पुढे नवीन आटोमॅटिक सिग्नल यंत्रणा नसल्याने कल्याणवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच ट्रेन एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. चाकरमान्यांना एक एक तास ट्रेनमध्ये उभा राहून प्रवास करावा लागत होता.