Sahitya Sammelan : युवा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, मंगळवारी संमेलनाचे वाजणार बिगुल
युवा कादंबरीकार प्रणव सखदेव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या युवा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे भूषविणार आहेत. 12 एप्रिल रोजी सकाळी 9:50 वाजता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन (Yuva Sahitya Sammelan) 12 व 13 एप्रिल, 2022 रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर (Dr. Kashinath Ghanekar) नाट्यगृहात संपन्न होणार आहे. या दोन दिवसीय साहित्य संमेलनातील विविध सत्रे नाट्यगृहातील दोन सभागृहे आणि मोकळ्या प्रांगणात पार पडतील. संमेलनासाठी या तिन्ही सभास्थानांचे दिवंगत साहित्यिक वि.ल. भावे, गीतकार पी. सावळाराम आणि अभिनेत्री-कथाकथनकार मुग्धा चिटणीस-घोडके यांच्या स्मरणार्थ नामकरण करण्यात आले आहे. रविवारी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात झालेल्या बैठकीत ‘कोमसाप’कडून त्याची घोषणा करण्यात आली. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात तिन्हीही सभागृहांमध्ये विविध साहित्यिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील परिसंवाद, काव्यसंमेलने, गझलसंमेलने, अभिवाचन, कथाकथन आदी सत्रांमध्ये नवोदित साहित्यिक आपल्या प्रतिभेचा आविष्कार सादर करतील. (Preparations for state level youth literature convention are in final stage)
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार
युवा कादंबरीकार प्रणव सखदेव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या युवा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे भूषविणार आहेत. 12 एप्रिल रोजी सकाळी 9:50 वाजता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कोमसापचे संस्थापक विश्वस्त ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा आणि ठाण्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला
उद्घाटन सोहळा तसेच अन्य साहित्यिक सत्रे होणाऱ्या मुख्य सभागृहाला ठाण्यातील आद्य आधुनिक ग्रंथकार ‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि. ल. भावे यांचे नाव देण्यात आले आहे. तर येथील लघु सभागृहाला गेल्या पिढीतील प्रसिद्ध सिनेगीतकार पी. सावळाराम यांचे आणि मोकळ्या प्रांगणातील सभास्थानाला दिवंगत अभिनेत्री-कथाकथनकार मुग्धा चिटणीस-घोडके यांचे नाव देण्यात आले आहे. रविवारी झालेल्या बैठकीत ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी ही औपचारिक घोषणा केली. यावेळी कोमसाप युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षला लिखिते, प्राचार्य सीमा हर्डीकर, प्राचार्य सुयश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विश्वस्त कमलेश प्रधान, तसेच कोमसापचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आणि अंतिम नियोजनाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. (Preparations for state level youth literature convention are in final stage)
इतर बातम्या
ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश