Thane Raj Thackeray : तलवार दाखवणं भोवणार? राज ठाकरेंवर ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार (Sword) दाखवली होती. यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकतो.
ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार (Sword) दाखवली होती. यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच राज ठाकरेंच्या भाषणाचीही तपासणी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. काल ठाण्यात मनसेची उत्तर सभा झाली. यादरम्यान कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना तलवार दिली. ती त्यांनी सभेदरम्यान दाखवली. यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुदी आहेत. अशाप्रकारचे गुन्हे महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड तसेच अस्लम शेख यांच्यावरही दाखल झाले होते. यासंदर्भात भाजपा नेते मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली होती.
‘आणखी केस पडली तरी काय फरक पडणार?’
राज ठाकरे यांनीही काल तलवार उगारली होती. त्यामुळे ठाण्याच्या स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, याविषयी मनसेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर कालच्या सभेत विरोधकांवर आणि वादग्रस्त विषयांवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्यावर आधीच केसेस आहेत, अजून एखादी पडली तरी काही बिघडत नाही. अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला, तर त्यात काही वेगळे, असे काल म्हणाले होते.
उत्तर सभेत भोंग्यांविषयीची भूमिका केली स्पष्ट
मशिदीवरचे भोंगे काढावेच लागतील, अन्यथा हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, म्हणत राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्येचही दिसून आले. तर यावेळी ही तर सुरूवात आहे. याच्या पुढचा वाण मला भात्यातून काढायला लावू नका, असे म्हणत त्यांनी इशाराही दिला.