‘घरमें बैठा हे नकली, अयोध्या जा रहा है असली’, शिवसैनिकांच्या घोषणांनी ठाणे रेल्वे स्टेशन दुमदुमले, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिक रवाना
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा ऐतिहासिक होईल, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसह उत्तर प्रदेशातील अनेक तरुणही या दौऱ्यात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ठाणे – घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली, शिवसेना जिंदाबाद, वाघ आला रे वाघ आला अशा घोषणांनी ठाणे रेल्वे स्टेशन दुदुमन गेले होते. निमित्त होते आदित्य ठाकरेंच्या(Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यासाठी (Ayodhya tour)निघालेल्या शिवसैनिकांच्या जथ्थ्याचे. दुपारच्या सुमारास अयोध्येला जाणारी स्पेशल ट्रेन (special train)आल्यानंतर, ठाणे रेल्वे स्टेशनवर युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा स्पेशल ट्रेन्समधून शिवसैनिक आणि युवा सेनेचे हजारो कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. ठाणे रेल्वेस्टेशनवर युवासेनेचे वरुण सरदेसाई, माजी महापौर नरेश मस्के यांच्या उपस्थितीत ही स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाली.
अयोध्येत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येसाठी उद्या रवाना होण्याची शक्यता आहे. १५ तारखेच्या दिवशी अयोध्येत शिवसेना खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, राजन विचार यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. रामलल्लाच्या दर्शनसोबतच शरयू तीरावर आरती, संत महतांच्या भेटी असा हा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.
आदित्य ठाकरेंचा दौरा ऐतिहासिक होणार- वरुण सरदेसाई
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा ऐतिहासिक होईल, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसह उत्तर प्रदेशातील अनेक तरुणही या दौऱ्यात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेना केवळ माध्यमांसाठी बोडघेवडेपणा करत नाही. बाबरी ढाचा पडला त्यावेळी शिवसेनेनेच भूमिका घेतली होती, अशी आठवण नरेश मस्के यांनी यानिमित्ताने करुन दिली आहे.
राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्याने राजकीय टोलेबाजी
प्रभू रामावरील श्रद्धेपोटी दर्शनासाठी या दौऱ्यात जात असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिकांनी दिल्या आहेत. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्यांना भीक घालणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. शिवसेना हा देशातील जुना पक्ष आहे, तसेच पक्षाने चिन्ह, झेंडा आणि नेता कधी बदलला नाही, अशी टीका शिवसैनिकांनी मनसेवर केली आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच अयोध्येला जाण्याची तयारी सुरु असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
राज ठाकरेंच्या घोषणेनंतर शिवसेनेची अयोध्या दौऱ्याची घोषणा
राज ठाकरे यांनी अयोध्या दोऱ्याची तारीख ५ जून अशी जाहीर केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. अयोध्येत असली कोन आणि नकली कोन, अशी पोस्टरबाजीही करण्यात आली होती. दरम्यान अयोध्येचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. परप्रांतीय आंदोलनाप्रकरणी राज ठाकरेंनी माफी मागावी, त्यानंतरच त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द करण्याची घोषणा केली. त्यासाठी अयोध्येत मनसैनिकांना अटक करण्याचा कट होता, असा आरोप त्यांनी केला होता.