निखिल चव्हाण, Tv9 मराठी, ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) नावाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली. या मारहाण प्रकरणी ठाण्यातील राजकारण प्रचंड तापताना दिसत आहे. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात येऊन संबंधित महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) होते. जखमी महिला कार्यकर्त्याची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तालयात गेले. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या सगळ्या घडामोडींनंतर आता शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांसोबतच ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के आणि माजी उपमहापौर मिनाक्षी शिंदे या देखील होत्या. त्यांनी ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महिला कार्यकर्ता मारहाण प्रकरणी पोलिसांनी एकही एफआयआर दाखल करुन घेतला नाही, असा उद्धव ठाकरेंचा आरोप आहे. त्यानंतर नरेश म्हस्के अनेक पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली. या सगळ्या घडामोडींनंतर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“रोशनी शिंदे यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओही तयार करून घेण्यात आला.फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही झालं तर लगेच एसआयटी नेमली जाते. अटक केली जाते. मिंधे गटाकडून काही लोकांवर हल्ले झाले तर तिकडे फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही. एकूणच, गुंडागर्दीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री? मी म्हणत नाही, पण गुंड पोसणारं एक खातं असतं. त्यांनी जाहीर करावं. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री असं खातं तयार करावं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तसं या सरकारसारखे आम्ही शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द ठाण्याच्या नागरिकांमध्ये आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आयुक्त असून पदासाठी लाचारी करत असतील तर पदभार स्वीकारताना शपथ घेतली असेल तर त्या शपथेशी प्रतारणा आहे. बिनकामाचा आयुक्त याला निलंबित करा किंवा बदली करा. कणखर आयुक्त ठाण्याला द्या. ते खरच गृहमंत्री असतील नाहीतर लोकं तुमच्या कारभारावर थुंकतील”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.