कल्याणमध्ये भाजपच्या नाराजीचा श्रीकांत शिंदे यांना फटका बसणार?
कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी आज शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. शिवसेनेच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचं नाव आलं नव्हतं. त्यामुळे या जागेवरुन सस्पेंस तयार झाला होता. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेचा जुना वाद आहे. ज्याचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसेल का हे निवडणुकीच्या नंतरच कळणार आहे.
Kalyan Loksabha : कल्याणमधून शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदेच असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळं आतापर्यंत शिंदे गटाचे 10 उमेदवार घोषित झाले आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होणारा आहे. दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार गणपतशेठ गायकवाड आगे बढो, हम तुम्हारे साथ है. हमारा खासदार कैसा हो, गणपत शेठ जैसा हो अशा घोषणा दिल्या आहेत. कल्याणमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी, घोषणाबाजी करत श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव केला. त्यानंतर पुढच्या 12 तासांतच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केली.
फडणवीसांनी जाहीर केली उमेदवारी
श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही असं सांगत फडणवीसांनीच कल्याणमधून त्यांची उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. ज्यात श्रीकांत शिंदे उमेदवार नको आणि श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही, असा ठराव केला. मात्र स्वत: फडणवीसांनीच श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करुन, वादावर पडदा टाकला.
शिवसेना विरुद्ध भाजप वाद
गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी युतीचं वातावरण खराब करु नये असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. आमदार गणपत गायकवाड सध्या जेलमध्ये आहेत. गोळीबार प्रकरणात ज्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. 2 फेब्रुवारीला आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. 3 आठवड्यानंतर महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
या गोळीबारानंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड विरुद्ध शिंदेंची शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आला. तर ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी, श्रीकांत ठाकरेंना टोला लगावला आहे. उमेदवारी स्वत:च्या पक्षाऐवजी फडणवीसांनी जाहीर केल्यानं आता कमळावर लढणार की धनुष्यबाणावर असा निशाणा प्रतिस्पर्धी वैशाली दरेकरांनी लगावला आहे.
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नव्हतं. पण आता फडणवीसांनी जाहीर केल्यानंतर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. म्हणजेच आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे 10 उमेदवार जाहीर झाले आहेत.