Devendra Fadnavis | खरे गद्दार कोण?, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भाजपच्या मतांवर निवडून आले. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले. गद्दार कुणाला म्हणायचे असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही आहात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कल्याण : कल्याणमध्ये भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. मुंबईत वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहे. एक कार्यक्रम ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. तर दुसरा कार्यक्रम बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनेचे दुकान बंद करेन. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही.
परंतु, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या मतांवर निवडून आले. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले. गद्दार कुणाला म्हणायचे असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही आहात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले. ४० जणांनी भाजपसोबत सरकार स्थापन केली. कारण ते युतीच्या नावावर मतं मागून निवडून आले होते. नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो लावून मतं मागितली होती. पण, उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. दुसऱ्याला गद्दार म्हणण्यापेक्षा खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, अशी टीकाही देवेद्र फडणवीस यांनी केली.
एकेकाळी संताजी-धनाजी यांची दहशत होती. मुगलांना संताजी-धनाजी दिसायचे. रात्री मुगल दचकून उठायचे. मोदी आणि शाह याचे नाव घेतलं की, अशीच अवस्था उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची होत आहे. उद्धव ठाकरे यांचे काल भाषण ऐकलं. पण, ते भाषण की ओकारी म्हणावं. उद्धव ठाकरे यांची अवस्था अशी आहे की, त्यांना जळी, स्थळी काष्टी पाषाणी मोदी-शाह दिसतात.
तुम्ही शिवसैनिकांनाही भेटत नाही
नरेंद्र मोदी यांनी मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत काश्मिरमध्ये तिरंगा लावला. त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेता. नरेंद्र मोदी हे सीमेवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही शिवसैनिकांना भेटायला जात नाही. असा खरपूस समाचारही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा घेतला.
उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षे कुंभकर्णाचे होते. कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतून फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेत. असं आम्ही नव्हे तर तुमच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, याची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी काढून दिली.