BREAKING | ठाण्यात घडामोडी वाढल्या, ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला. शिंदे गटाने शिवाईनगर येथील शाखा ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलीय.
ठाणे : राज्यभरात होळीचा उत्साह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात अनपेक्षित घटना घडत आहेत. ठाण्याच्या शिवाई नगर येथील शिवसेना शाखेचा ताबा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचले. त्यानंतर एकच राडा सुरु झाला. ठाकरे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. विशेष म्हणजे हा वाद कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेचा ताबा घेतल्यानंतर आता ठाकरे गट प्रचंड आक्रमक झालाय. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण तापलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी घटनास्थळावरुन ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “स्थानिक पदाधिकारी म्हणजे कोण? आम्ही सगळे इथलेच आहोत. आतमध्ये सगळे स्थानिक पदाधिकारीच आहेत. बाहेरुन कोणीतरी येणार, मी जिल्हा प्रमुख म्हणून आलेलो आहे. या ठिकाणचे नगरसेवक स्थानिक आहेत. इथे बसणारी लोकं आमच्या कार्यकर्त्यांसोबत बसायचे. पण ते या ठिकाणी हक्क सांगायला लागले तर स्थानिक पदाधिकारी कसं ऐकणार? ही शाखा सरनाईक यांनी बांधलेली आहे”, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
‘आम्ही का म्हणून बसायला देऊ?’
“आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याचा पूर्ण डोलारा हा एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेला आहे. ही शाखा सरनाईकांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे यांचा अधिकार काय आहे? त्यांना काम करायचं आहे तर त्यांनी बाजूला एखादं कार्यालय भाड्याने घ्यावं. आम्ही त्यांना मदत करु. शेवटी समाजपयोगी कार्यालयाला मदत करणं गरजेचं आहे. पण आमची संपत्ती आहे. आमची जागा आहे. शिवसेना म्हणून मान्यता आहे. यांना आम्ही का म्हणून बसायला देऊ?”, असा सवाल त्यांनी केला.
“शिवसेना आम्हाला अधिकृत दिलेलं आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव दिलं आहे. आम्हाला धनुष्यबाण मिळालं आहे. या शाखेवर धनुष्यबाण आहे. त्यांना मशाल निशाणी मिळाली आहे. त्यामुळे यांचा अधिकार काय असू शकतो? ही शाखा स्थानिकांच्या ताब्यात आहे. टाळा तोडलेलं नाही. त्यांच्याबरोबर कोणते स्थानिक आहेत? ते खोटं बोलत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी शिवसेनेच्या विचारांनाच टाळं लावलं आहे”, असा टोला त्यांनी लगावला.