धाकधूक वाढली! ठाण्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या सात वर; घाणामधून आलेल्या चार जणांना लागण
ठाण्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता सात वर गेली आहे. शहरात ओमिक्रॉनचा प्रसार होत असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
ठाणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असतानाच आता ओमिक्रॉनने देखील शिरकाव केला आहे. ठाण्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता सात वर गेली आहे. शहरात ओमिक्रॉनचा प्रसार होत असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. घाणामधून ठाण्यात चार जण आले होते. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ते सर्वजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची ओमिक्रॉनची देखील चाचणी करण्यात आली. ओमिक्रॉनचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे.
इमारत केली सील
या चार ओमिक्रॉनबाधित रुग्णांना उपचारासाठी ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमिक्रॉनबाधितांमध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. तसेच ते राहात असलेल्या मजल्यावरील सर्व परिवारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबांची चाचणी निगेटिव्ही आल्याने पालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ही आली तरी देखील काही दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने या संबंधित कुटुंबांना करण्यात आले आहे.
नववर्षाच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर
एकीकडे शहरात ओमिक्रॉनने शिरकवाव केला आहे. तर दुसरीकडे शहरात हळूहळू आता कोरोनाचे रुग्ण देखील वाढायला सुरुवात झाली आहे. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार पोहोचली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, आवश्यक त्या उपयायोजना राबवण्यात येत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पर्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Corona vaccination | मुलांच्या लसीकरणाची 1 जानेवारीपासून नोंदणी, असे करा बुकींग…!