ठाणे : ठाण्यातील प्रभात टॉकीज गल्लीत इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानांना भीषण आग लागली आहे. या आगीत इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. (Thane Fire in Electronic market Near Prabhat Talkies Loss of millions of rupees)
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आग आटोक्यात येण्यास शर्थीचे प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवरील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असलेल्या दुकानांना आग लागली. सकाळी 8 च्या सुमारास या मार्केटमधील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारणं केले. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्या आहेत.
या दुकानातील बहुतांश व्यापारी हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना ही आग लागल्याची दिसले. त्यानंतर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करुन याबाबतची संपूर्ण माहितीही देण्यात आली. यानंतर तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घटनास्थळी धाव घेतली.
दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक
ठाण्याच्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये लागलेल्या आगीवर जवळपास एका तासाने नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आगीत दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. तर इतर दुकानांचे किरकोळ नुकसान झाले. या दुकानात बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने ही आग आटोक्यात येण्यास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
कोणतीही जीवितहानी नाही
या आगीत गितेश इलेक्ट्रॉनिक्स, एफ एम सी मोबाईल्स ही दुकाने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. व्यापाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा तात्काळ प्रतिसाद यामुळेच ही आग जास्त भडकली नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
पाहा व्हिडीओ :
(Thane Fire in Electronic market Near Prabhat Talkies Loss of millions of rupees)
संबंधित बातम्या :
अंबरनाथच्या ओढ्यात हजारो मृत माशांचा खच, पोल्ट्री फार्मच्या कचऱ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
ठाणे मनपाची धडक कारवाई सुरुच, दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त