ठाणे महापालिकेचं ‘विशेष लसीकरण सत्र’, 300 रिक्षाचालकांचं लसीकरण
लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
ठाणे : लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या पुढाकाराने आज शहरातील रिक्षाचालकांचे विशेष कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न झाले.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त आयुक्त संदीप माळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी यांच्यासह रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
18 वर्षावरील रिक्षाचालकांसाठी ‘विशेष लसीकरण सत्र’
आपल्या दैनंदिन प्रवासात रिक्षाचालक हा महत्त्वाचा घटक आहे. सर्व रिक्षाचालक हे प्रवासी घेवून शहरात सर्वत्र फिरत असतात. सातत्याने ते अनेकांच्या संपर्कात येत असून त्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील 18 वर्षावरील रिक्षाचालकांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘विशेष लसीकरण सत्र’ आयोजित करण्यात आले होते.
दिवसभरात 300 रिक्षाचालकांचं लसीकरण
या लसीकरण मोहिमेंतर्गत जवळपास आज 300 रिक्षाचालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. सरकारकडून लसीकरणाचा साठा उपलब्ध होताच उर्वरितांचे देखील लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितीत सर्व रिक्षाचालकांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
हेही वाचा : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ