Ganesh Festival : ठाणे महापालिका म्हणते, यंदा गणेशोत्सव जोमाने साजरा करूया!
Ganesh Festival : अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कार्यवाह आर. के. पाटील यांनी वाचले. त्यास तसेच मागील वर्षाच्या जमाखर्च यास सभेने मंजुरी दिली. तसेच नवीन कार्यकारी मंडळासही सभेने मान्यता दिली.
ठाणे : कोरोनाचे (corona virus) सावट दूर होत असल्याने उत्सव काळजीपूर्वक पण उत्साहाने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आपणही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करूया, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (sandip malavi) यांनी आज केले. ठाणे महापालिका कर्मचारी श्री गणेशोत्सव मंडळाच्या 40व्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या वतीने आजची सभा घेण्यात आली. मंडळाचे कार्यवाह आर. के. पाटील यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती संदीप माळवी यांना केली. त्यानंतर उपाध्यक्ष तथा पालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कार्यवाह आर. के. पाटील यांनी वाचले. त्यास तसेच मागील वर्षाच्या जमाखर्च यास सभेने मंजुरी दिली. तसेच नवीन कार्यकारी मंडळासही सभेने मान्यता दिली. यंदाचा गणेशोत्सव अधिक जोमाने साजरा करण्याबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेस उपाध्यक्ष तथा उप आयुक्त मनीष जोशी, मंडळाचे सेक्रेटरी पी. एच. पाटील, खजिनदार संजय संपत माने, कार्यवाह आर. के. पाटील, उप आयुक्त अनघा कदम, उप आयुक्त (प्र.) तथा क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते.
सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू राहणार
दरम्यान, ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जे करदाते त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभागसमिती कार्यालयात येऊन भरतात, अशा करदात्यांना त्यांचा देय मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. मंगळवार दिनांक 09 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट आणि शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत कर संकलनाकरिता कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.
तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरिता, मालमत्ता कराची देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ठाणेकर नागरिकांच्या सोईसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.