ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, उद्या पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणी येणार?
ठाणे शहरात होणारा पाणी पुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत आहे.
ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवारी (24 जुलै) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
सध्यस्थितीत अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. नदीतील पूराच्या पाण्यासोबत पानवेली आणि नदीतील गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणी पुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत आहे. सदरचा वाहत आलेला कचरा काढण्यासाठी शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. पण या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
कोणत्या भागात कधी पाणी सुरु राहील?
स्टेम वॉटर डिस्ट्री.अँण्ड इन्फा.कं. प्रा.लि. यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कंम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात सुरु राहणार आहे. तसेच दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कळवा, साकेत, रुतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्याचा काही भागाचा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
दरम्यान या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा :
ठाण्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने शैक्षणिक खर्च उचलला
इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका