Thane new rules Guidelines : ठाण्यात दुकानांची वेळ बदलली, काय सुरु काय बंद?
ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील दुकानांची वेळ आता वाढवण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर नियमावली प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे (Thane new rules Guidelines)
ठाणे : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात ज्या प्रतिबंधित क्षेत्रांमधील परिस्थिती नियंत्रणात आली किंवा ज्या भागांमधील पॉझिटिव्ही रेट हा 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने अशा भागांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे शहरातही पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील दुकानांची वेळ आता वाढवली जाणार आहे. याबाबतची सविस्तर नियमावली प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये Break The Chain अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधाची माहिती :
1) सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 77 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 7 या वेळेत सुरु राहतील.
2) सर्व आवश्यक गटात नसलेली, केवळ इतर एकल दुकाने (मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स व्यतिरिक्त) सकाळी 7 ते दुपारी 7 या वेळेत सुरु रहातील. परंतु सदर दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद रहातील.
3) आवश्यक वस्तूंच्या बरोबर अन्य वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
4) दुपारी 2 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगा व्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असेल. शासनाच्या 12 मे, 2021 च्या आदेशानुसार होम डिलेव्हरीस परवानगी असेल.
5) कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालया व्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु रहातील. जास्तीची उपस्थितीची आवश्यकता असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीने वाढीव उपस्थिती ठेवण्यात यावी.
6) कृषी विषयक दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी म्हणजेच सोमवार ते रविवार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुरु रहातील.
7) दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाही. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ् जोपर्यंत संपत नाही तोपर्यत बंद ठेवण्यात येईल. तसेच शासनाच्या 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.
8) यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या वेळेनुसार होम डिलीव्हरी सुरुच राहतील.उक्त आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा :
धक्कादायक ! ठाणे महापालिका ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार?
Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु