Thane Bus Accident : ठाण्यात रात्रीच्यावेळी थरार… खासगी बस थेट घरात घुसली, त्यानंतर जे घडलं त्याने…
पुण्यातील धक्कादायक घटनेची आठवण करून देणारी घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यात एका मद्यधुंद अवस्थेतील बस चालकाने खासगी बस थेट घरात घुसवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळा नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 12 ऑक्टोबर 2023 : काही वर्षापूर्वी पुण्यात संतोष माने या चालकाने मद्यधुंद अवस्थते बस चालवून कहर उडवून दिला होता. त्यात 9 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणेकरांच्या मनामध्ये एकच धास्ती बसली होती. याच घटनेची आठवण करून देणारी घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यात एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाने खासगी बस थेट घरात घुसवली. त्यामुळे घरातील लोक आहे तसेच घरातून बाहेर पळाले. अचानक घरात बस घुसल्याने एकच आफरातफर माजली. स्थानिकांनी या बसचालकाला पकडलं अजून पोलिसांच्या हवाली केलं आहे. मात्र, अचानक झालेल्या या प्रकारामुळे ठाणेकर चांगलेच हादरून गेले आहेत.
कोपरी रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री 9 वाजता ही धक्कादायक घटना घडली. एक खासगी बस घरात घुसून अपघात झाल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. बस चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे अनियंत्रित बस समोरच्या घरातच घुसली. या घटनेत सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, घराचे आणि घराच्या आसपास तसे रस्त्याच्या लगत असलेल्या वाहनांचे अतोनात नुकसान झालं आहे.
अन् बस घरात घुसली
ठाणे पूर्वेतील कोपरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. खासगी कंपन्यांच्या बसेस पीक ड्रॉपसाठी या ठिकाणी जमतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. वाहनांची सतत वर्दळ असल्याने कर्ण कर्कश आवाजही या परिसरात ऐकायला मिळतात. याच परिसरात बस पार्किंग केल्या जात असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो.
काल रात्री 9 वाजता या परिसरातून खासगी बस जात होती. अचानक या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस इकडे तिकडे धावू लागली. बसच्या धडकेत अनेक वाहनांचं नुकसान झालं. त्यानंतर ही अनियंत्रित बस फुटपाथ पार करून थेट घरातच घुसली. त्यामुळे घरात बसलेले लोक तात्काळ घराबाहेर पडले. प्रसंगावधान राखून घराबाहेर पडल्याने कोणताही जीवित हानी झाली नाही. मात्र, घरात बस घुसल्याने घराचं मोठं नुकसान झालं आहे.
नागरिकांनी चालकाला…
बस घरात घुसताच स्थानिक नागरिक तात्काळ धावून आले. संतप्त नागरिकांनी या वाहन चालकाला बेदम चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. हा चालक मद्यधुंद अवस्थेत होता असं सांगण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
स्थानिकांचा आरोप काय?
बस थांबा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. नागरिकांची वर्दळ सुरू असते. सकाळच्या सुमारास त्या परिसरात कपडा बाजार भरलेला असतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बस चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच वाहतूक पोलिस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे.