पोलिसांचं सिक्रेट ऑपरेशन, ‘त्या’ आरोपींकडे तब्बल 51 तोळे 510 ग्रॅम सोनं सापडलं, मोठा छडा लागला
ठाणे गुन्हे शाखा युनिट-3 ने मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 50 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 70 गुन्हे उकलले आहेत. यामध्ये सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी आणि वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईने ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पोलिसांनी आपला जीव धोक्यात टाकून कुख्यात चोरट्यांना शोधून काढण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांना संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे या सिक्रेट ऑपरेशनमधून पोलिसांनी तब्बल 70 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलं आहे. गुन्ह्यांची संख्या पाहता आरोपी किती अट्टल चोर आहेत, याची प्रचिती आपल्याला येत असेल. या आरोपींच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. या चोरट्यांनी कुणाकुणाचे ऐवज चोरले आहेत त्यांना ती आता मिळणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि शीळ डायघर परिसरातील महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज चैन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून पोबारा करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाला यश आले आहे. तब्बल ५० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत पोलिसांनी चौकशीत ७० विविध गुन्ह्यांची उकल केली आहे.
ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयीत इसम हे कल्याणमधील आंबिवली परिसरात येणार असल्याचे गुप्त बातमीदारमार्फत खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-०3 कल्याण कडील पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावला. यावेळी पोलिसांनी संशयीत तौफीक तेजीब हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली, अब्बास सल्लु जाफरी आणि सुरज उर्फ छोट्या मनोज सांळूखे यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
आरोपींकडून काय-काय हस्तगत केलं?
ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चैन स्नॅचिंगचे ४० गुन्हे, मोबाईल चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ०६ गुन्हे अशा ७० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी चैन स्नॅचिंग करून चोरी केलेला तब्बल ५१ तोळे ५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन तसेच ०६ मोटार सायकली, एक मारूती स्विफ्ट कार असा ५० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईत ७० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस पथकाला यश आले. याप्रकरणी अधिक तपास ठाणे पोलीस करत आहेत.