मोठी बातमी | देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, उद्धव ठाकरे यांची थेट मागणी, रोशनी शिंदे प्रकरण तापलं
सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तसं या सरकारसारखे आम्ही शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द ठाण्याच्या नागरिकांमध्ये आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
ठाणे : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) मारहाण प्रकरणवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. अशा घटनेनंतर फडतूस गृहमंत्री फडणवीस (Fadanvis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर एवढ्या मारहाणीनंतरही साधा एफआयआर दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांनी ही लाचारी का पत्करली आहे? ठाणे पोलीस आयुक्तांनाही याप्रकरणी निलंबित करा अन्यथा त्यांची बदली करा, असा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यात सोमवारी संध्याकाळी मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रशमी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काल नेमकं काय घडलं, हे जाणून घेतलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्तांचा समाचार घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाण्यात रोशनी शिंदे प्रकरणी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ रोशनी यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओही तयार करून घेण्यात आला.फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही झालं तर लगेच एसआयटी नेमली जाते. अटक केली जाते. मिंधे गटाकडून काही लोकांवर हल्ले झाले तर तिकडे फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही. एकूणच, गुंडागर्दीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री? मी म्हणत नाही, पण गुंड पोसणारं एक खातं असतं. त्यांनी जाहीर करावं. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री असं खातं तयार करावं.
‘शिवसैनिक नपुंसक नाहीत’
शिंदे सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तसं या सरकारसारखे आम्ही शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द ठाण्याच्या नागरिकांमध्ये आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आयुक्त असून पदासाठी लाचारी करत असतील तर पदभार स्वीकारताना शपथ घेतली असेल तर त्या शपथेशी प्रतारणा आहे. बिनकामाचा आयुक्त याला निलंबित करा किंवा बदली करा. कणखर आयुक्त ठाण्याला द्या. ते खरच गृहमंत्री असतील.. नाही तर लोकं तुमच्या कारभारावर थुंकतील. असा चेहरा घेऊन जनतेसमोर जायला लाज वाटेल. तुमच्यात हिंमत असेल तर ताबडतोब पोलीस आयुक्तांना निलंबित करा.. अन्यथा बदली करा. हे लाचार पोलीस रक्षणकर्ते करत नाहीत. उगाच सावरकरांच्या यात्रा काढायच्या पण त्यांच्या विचारांची प्रतारणा करायची, हे बंद करा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.