Thane: शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना घरी पाठवले
ठाण्यातील वसंत विहार हायस्कुलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शाळेची फी वेळेवर न भरल्याने विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे.
ठाणे: इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी (Student) सकाळी शाळेत गेला. त्याला आणि इतर काही मुलांना वर्गातून बोलावून मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर बसवले. त्याच्या पालकांना मुख्याध्यापकांनी (Principal) शाळेत बोलावून घेतले. शाळेची फी (School Fee) भरली नाही म्हणून त्याला घरी पाठवले. या प्रकाराने निराश झालेल्या त्या विद्यार्थ्याने घरी आल्यावर कागद आणि पेन्सिल हातात घेतली. आणि जे रेखाटले ते पाहून आई वडिलांच्याही डोळ्यात पाणी आले. त्या चित्रात मागे शाळा होती, तो विद्यार्थी शाळेच्या प्रवेशशद्वारा बाहेर उभा होता. कारण त्याला शाळेत एंट्रीचं नव्हती. त्या शाळेबाहेर नो एन्ट्री असे लिहिले होते.
ठाण्यातील वसंत विहार हायस्कुलमधील धक्कादायक प्रकार
ठाण्यातील वसंत विहार हायस्कुलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेतील पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे गेल्या काही महिन्यांचे शाळेची फी वेळेवर न भरल्याने शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना शाळेतून घरी पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका विद्यार्थ्याचे पालक आशीर्वाद आयरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. दरम्यान, शाळेत दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. याबाबत शाळा प्रशासनाला विचारले असता या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवले नाही तर पालकांना शुल्क भरण्याबाबत कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक परिस्थिती बिघडल्याने फी वेळेवर भरू शकले नाहीत
कोरोना काळात मागील दोन वर्षे ऑफलाईन माध्यमातून सुरु असलेली वसंतविहार हायस्कुल ही शाळा मागील आठवड्यात प्रत्यक्ष सुरु झाली. या काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्याने काही पालक आपल्या पाल्यांचे शाळेचे शुल्क वेळेवर भरू शकले नाहीत. शाळा सुरु झाल्यानंतर सोमवारी शुल्क न भरलेल्या पाच विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा प्रशासनाने शाळेत बोलवून घेतले व आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठविल्याने संतप्त पालक आशीर्वाद आयरे यांनी शाळेत धाव घेतली व घडल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अरेरावीची उत्तरे देण्यात आली. आपल्या मुलांना घरी घेऊन जा व शुल्क पूर्ण भरल्यानांतरच त्यांना शाळेत पाठवा असे मुख्याध्यापक म्हणाल्याचेही आयरे यांनी सांगितले.