Kalva Development : कळव्यातील मनिषा नगरचा विकास आता म्हाडामार्फत होणार
या प्रकरणात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पाठपुरावा केला. सदर भूखंड यूएलसीचा असल्याने तसेच बिल्डरने अटीशर्तींचा भंग केलेला असल्याने या जमिनीचा ताबा शासनाकडे यावा, यासाठी डॉ. आव्हाड हे प्रयत्नशील होते. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुनावणी झाली. या सुनावणीनंतर विकासकाने यूएलसीच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
ठाणे : दुर्बल घटकांसाठी बांधलेली घरे पैसे अदा करुनही रहिवाशांना न देणार्या विकासका (Developer)ला चांगलाच दट्ट्या बसला आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी पाठपुरावा करुन यूएलसीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून हा भूखंड शासकीय मालकीचा करुन घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुमारे 163 जणांना आपली हक्काची घरे तर मिळणारच आहेत. शिवाय, ही जमिन आता म्हाडा (Mhada)कडे सोपवण्यात आली असल्याने परिसरातील अनधिकृत बांधकामांचाही पुनर्विकास होणार आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.
कळव्यातील पौर्णिमा बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक
ठाण्यातील मनिषा नगर येथे मधुकांता आचार्य यांच्या मालकीच्या 28 हजार 172 चौरस मीटर जमिनीवर कमाल नागरी जमीन धारणा कायद्यानुसार सन 1984 मध्ये दुर्बल घटकांकरीता घरबांधणी योजना सरकारने मंजूर केली होती. त्यानुसार दहा टक्के जिल्हाधिकारी कोट्यातून गरिबांना परवडणारी घरे देणे बंधनकारक केले होते. या घरांसाठी सुमारे 163 जणांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज पात्र ठरल्यानंतर या कुटुंबीयांनी घरांसाठी 36 लाख रुपये एवढी 20 टक्के रक्कम नियानुसार बिल्डरकडे जमादेखील केली होती. कळव्यातील पौर्णिमा बिल्डरने ही जागा विकसित करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार 9 इमारतींमध्ये 394 सदनिका सदर बांधकाम व्यावसायिकाकडून बांधण्यात आल्या होत्या. मात्र, पात्र रहिवाशांना घरे न देता बिल्डरने ही घरे परस्पर विकली. त्यामुळे पैसे अदा करुनही 163 जणांना आपल्या हक्काच्या घरांचा ताबा मिळाला नव्हता. तसेच, अनधिकृत बांधकामेही या बिल्डरने केली होती. त्यामुळे या बेकायदा बांधकामातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न निर्माण झाला होता.
विकासकाने यूएलसीच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश
या प्रकरणात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पाठपुरावा केला. सदर भूखंड यूएलसीचा असल्याने तसेच बिल्डरने अटीशर्तींचा भंग केलेला असल्याने या जमिनीचा ताबा शासनाकडे यावा, यासाठी डॉ. आव्हाड हे प्रयत्नशील होते. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुनावणी झाली. या सुनावणीनंतर विकासकाने यूएलसीच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. अतिक्रमण हटवून ही जमीन सरकार ताब्यात घेत कागदोपत्री महाराष्ट्र सरकार अशी नोंद केली केली. त्यानंतर आता ही जमीन म्हाडाकडे सोपवली गेली आहे. त्यामुळे या परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या भूखंडांवरील सर्व अनधिकृत बांधकामांचे पुनर्वसन करण्याचा विचार म्हाडातर्फे केला जात आहे. शिवाय, आजूबाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामांच्याच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बेकायदा बांधकामांनाही नव्या पुनर्विकास योजनेमध्ये सामावून घेणार
सदर भूखंडाच्या शेजारी असलेल्या बेकायदा बांधकामांनाही नव्या पुनर्विकास योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत वास्तूमध्ये राहणार्या नागरिकांना अधिकृत घरांचा ताबा मिळणार आहेच; शिवाय गेली अनेक वर्षे गरजेपोटी विकत घेतलेल्या अनधिकृत घरांमध्ये राहणार्यांचाही अधिकृत घरांमध्ये राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच गेली 38 वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला असल्याने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत, असेही मिलींद पाटील यांनी सांगितले. (The development of Manisha Nagar in Kalava will now be done by MHADA)