ठाणे : शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे महाराष्ट्र दिना (Maharashtra Day)चे औचित्य साधत सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची या मोहिमेंतर्गत होणाऱ्या या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे, अशी माहिती उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित विकास प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपसंचालक डॉ. मुळे बोलत होते. ठाण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि शतकी वाटचाल करणाऱ्या टाऊन हॉलमध्ये हे प्रदर्शन होणार असून ते 1 ते 5 मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असल्याचे डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले. (The Guardian Minister will inaugurate an illustrated exhibition in Thane on the occasion of Maharashtra Day)
या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, खासदार सर्वश्री डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, बाळाराम पाटील, रमेश पाटील, गणेश नाईक, किसन कथोरे, दौलत दरोडा, रविंद्र चव्हाण, प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, संजय केळकर, मंदा म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौगुले, कुमार आयलानी, गीता जैन, विश्वनाथ भोईर, रईस शेख, प्रमोद पाटील, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहुब उभारलेल्या या प्रदर्शनाच्या परिसरात सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांतून मांडण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने कोरोना सारख्या कठिण काळात केलेली कामगिरी, कृषी, आदिवासी विकास, शिवभोजन, महाआवास योजना, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास याबाबत सचित्र माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
ठाण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या टाऊन हॉलचे नूतनीकरण झाले असून त्याचे उद्घाटन आणि हे विभागीय प्रदर्शन एकाच वेळी होत असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. 1 ते 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी केले आहे. (The Guardian Minister will inaugurate an illustrated exhibition in Thane on the occasion of Maharashtra Day)