बदलापुरात उघडली जाणार समृद्धीची दारं!, बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी अशी मिळणार
बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आलंय. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
निनाद करमरकर, प्रतिनिधी, बदलापूर, ठाणे : राज्यात बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या जोरात सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असणार आहे. राज्यात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग असणार आहे. सदर रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात आहे. त्यामुळं बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे.
दोन वर्षांचा कालावधी लागणार
बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आलंय. साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होईल. तर, जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
आठ पदरी महामार्ग होणार
या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहे. सोबतच मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असणार आहेत. त्यामुळं अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे.
उद्योग, रोजगाराच्या संधी येणार
महाराष्ट्रात बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग अंबरनाथ तालुक्यातल्या बदलापूरमधून जात आहे. भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. तसेच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. पर्यायानं उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. त्यामुळं या महामार्गासोबतच ‘समृद्धी’ची दारं सुद्धा उघडली जाणार आहेत.