दूषित पाणी, जलपर्णीला रोखणार ही चिप; काय आहेत या चिपची वैशिष्ट्ये समजून घ्या
नदी पात्रात मोहने, गाळेगाव आणि म्हारळ हे ३ नाले येऊन मिळतात. त्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगविते.
ठाणे : महत्वाचा आणि सगळ्यात मोठा बारमाही पाण्याचा जलस्त्रोत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगवली. ती दूर करण्यासाठी काल सायंकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पाहणी केली. नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि जलपणी उगवू नये याकरिता पाठपुरावा करणारे कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी याबाबत नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या प्रकरणी आयुक्तांचीही भेट घेतली होती. आयुक्तांनी गुरुवारी पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार काल सायंकाळी आयुक्तांनी पाहणी केली.
असे होते प्रदूषण
यावेळी निकम यांच्यासह जागरुक नागरिक फाउंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि उमेश बोरगावकर, प्रशांत मोरे, दिलीप पाटील, महापालिकेचे अभियंता घनश्याम नवांगूळ आणि प्रमोद मोरे जलतज्ज्ञ गुणवंत प्रभाग अधिकारी दिनेश वाघचौरे आदी उपस्थित होते. नदी पात्रात मोहने, गाळेगाव आणि म्हारळ हे ३ नाले येऊन मिळतात. त्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगविते.
बायो सॅनिटाईझर इको चिपचा वापर
ही समस्या दरवर्षीची आहे. ती कायम स्वरुपी दूर करण्यासाठी काल पुन्हा पाहणी करण्यात आली. महापालिकेने मोहने आणि गाळेगाव नाला वळविला आहे. दोन एसटीपी प्लांट तयार केले आहे. त्यात ५० टक्केच प्रक्रिया केली जात आहे. नदी पात्रात काही ठीकाणी गॅबीयन बंधारे बांधण्यात यावे. त्यात बायो सॅनिटाईझर इको चिप टाकण्यात यावी. गॅबीयन बंधारे बांधण्याकरिता सीएसआर फंड घेऊन काम केले जाईल. म्हारळ नाल्याबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला जाईल. त्याचे काम मार्गी लावण्याकरिता महापालिका पाठपुरावा करणार असल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आश्वासित केले आहे.
पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाईल
भाऊसाहेब दांगडे म्हणाले, कल्याण-डोंबीवली येथील कार्यकर्ते आंदोलन करत होते. काही दूषित पाणी नदीत मिळते. जैविक शुद्धीकरण करणाऱ्या चिप वापरल्या जाणार आहेत. ठाणे, नाशिक मनपाने उपयोग केला. या चीपचा वापर करून दोन्ही नाल्यांवर काम करत आहोत. पाणी शुद्ध करून नदीत सोडलं जाईल.