ठाणे महापालिकेची धडक कारवाई, दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरुच आहे.
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरुच आहे. त्यांच्या आदेशानुसार शनिवारी (24 जुलै) दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
कोणत्या भागातील अनिकृत बांधकामांवर कारवाई?
दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.
दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.
हेही वाचा : ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल