कल्याण, डोंबिवलीत का होते वाहतूक कोंडी?; वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?
अपघातांची शक्यता असते असं काही डोंबिवलीकरांनी सांगितलं. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचाही वरचष्मा रिक्षा युनियनवर आहे.
ठाणे : कल्याण, डोंबिवली शहरं ही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांची शहरं म्हणून ओळखली जातात. बहुतांश चाकरमानी हे प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असतात. त्यातच परमिट प्रक्रिया सोपी झाल्याने रिक्षांची संख्या देखील वाढली आहे. अनेकदा रिक्षा या वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. त्यातच भाडं दिसलं की कुठेही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जातात. एक रिक्षा रस्त्यात थांबली की मागे वाहनांची रांग लागते. मोकळी जागा दिसली की कुठेही रिक्षा उभी केली जाते.
वाहतूक विभाग, आरटीओचं नियंत्रण नाही
कल्याण, डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी का होते याबाबत कल्याण डोंबिवलीकरांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. शहरात विशेषतः भाडे सोडण्यासाठी आणि भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभाग आणि आरटीओ यांचं कोणतंही नियंत्रण रिक्षांवर नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रवासी संघटनेने केला आरोप
शहरात वाहतूक कोंडी ही रिक्षांमुळे होत असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. अतिरिक्त रिक्षाही वाढल्या आहेत. रिक्षाचालकांची तपासणी केली जात नाही. कागदपत्रे बघितली जात नाही. आरटीओ आणि वाहतूक विभागाचे कोणतंही नियंत्रण रिक्षाचालकांवर नाही, असा आरोपी एमएच 05 या प्रवासी संघटनेने केला आहे.
लोकप्रतिनिधींचे युनियनवर वर्चस्व
रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करतात. मर्जीप्रमाणे भाडं घेतात. वाहनांच्या सलग रांगेतून मध्येच प्रवासी भाडं घ्यायला रिक्षा थांबवतात. यामुळे अपघातांची शक्यता असते असं काही डोंबिवलीकरांनी सांगितलं. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचाही वरचष्मा रिक्षा युनियनवर आहे.
आतातरी शिस्त लावणार का?
आपल्याच नागरिकांना होणाऱ्या त्रासावर युनियन नेते पुढाकार घेतील का ते पाहावं लागेल. त्याचप्रमाणे आरटीओ आणि वाहतूक विभाग हे रिक्षा चालकांना शिस्त लावतात का? त्यावरही नागरिक लक्ष ठेवून आहेत. कारण कायद्याची कोणतीही भीती नसल्याने हा मनमानी कारभार सुरू असल्याचं कल्याण डोंबिवलीकरांनी सांगितलं आहे. आतातरी शिस्त लावणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.