अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमध्ये सोसायटीच्या रस्त्यावर डंपर अडकून उलटता उलटता राहिल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या शिवालिक नगर परिसरात आज (28 जून) सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या परिसरातील रस्ता इतका अरुंद आहे की अग्निशमन दलाची गाडीही आतमध्ये जाऊ शकत नाही (Two wheels of the truck failed at the entrance of the Society of Ambernath).
शिवलिक नगर गृहसंकुलात 104 सदनिका आहेत. या संकुलाच्या मुख्य रस्त्यात बिल्डरने बांधकाम सुरू केल्यामुळे बाजूने एक अरुंद रस्ता सोसायटीला देण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता कच्चा असून डंपर किंवा फायर ब्रिगेड येईल इतकाही रुंद नाही. याच रस्त्याच्या कामासाठी मटेरिअल घेऊन आलेला एक डंपर सोमवारी (28 जून) सकाळी सोसायटीच्या दिशेनं वर चढत असताना अर्ध्या रस्त्यातच मातीत रुतला आणि डंपरची दोन चाकं हवेत गेली. त्यामुळे आता अर्धवट झालेल्या बांधकामावर हा डंपर कोसळतो की काय? अशी भीती निर्माण झाली. मात्र यावेळी शक्कल लढवत डंपर जागीच रिकामा करण्यात आला.
तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत डंपर मातीतच रुतलेला होता. डंपर काढण्यासाठी क्रेन सुद्धा आणणं शक्य नव्हतं. या अरुंद रस्त्यावर डंपर सुद्धा येऊ शकत नसेल, तर फायर ब्रिगेड कशी येणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे 104 सदनिकांच्या या गृहसंकुलात उद्या जर कुठे आग लागली आणि फायर ब्रिगेड सुद्धा जर डंपरप्रमाणे अशीच अडकून बसली, तर फायर ब्रिगेड सुद्धा रस्त्यातच रिकामी करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेनं आता स्वतःहून इथे लक्ष घालून काहितरी उपायोजना करण्याची गरज आहे.
हेही वाचा :
ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील 13 अनधिकृत बांधकामांवर हातोडा