ही कोण टपोरी लोकं आहेत? आधी कंटेनर हटवा… उद्धव ठाकरे येताच मुंब्र्यात भगवं वादळ
साहेबांच्या सुरक्षेची काळजी तुम्ही करू नका. गुंड बसले असतील तर त्यांना घ्या ताब्यात. ती आमची शाखा आहे. आम्ही जाणारच. तुम्ही दोन वर्षापासून आम्हाला त्रास देत आहात. साहेबांबरोबर पाच लोक येतील. साहेबांची जबाबदारी आमची आहे. त्या लोकांना बॅरिकेट्सच्या मागे ठेवा. साहेब तुमच्या ताफ्यात जातील. असं करू नका वातावरण खराब होतंय. आम्ही परत जाणार नाही हे सांगा, अशा शब्दात शिंदे गटाच्या नेत्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
दिनेश दुखंडे, गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यात ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा तोडण्यात आली, त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आहेत. उद्धव ठाकरे आल्यामुळे या ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तर समोरच शिंदे गटाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेला घेराव घातला आहे. उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत पोहोचू न देण्याचा निर्धार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर शाखेत गेल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा पवित्राच उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे मुंब्र्यात अति प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पोलीस दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र, दोन्ही गट ऐकायला तयार नसल्याने पोलिसांचीही चांगलीच कोंडी झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुलुंड टोलनाक्यावर येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मुलुंड टोलनाका ते मुंब्र्यात येईपर्यंत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचं प्रचंड स्वागत केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथील शाखेच्या काही अंतरावर आले. उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी पोलिसांनी त्यांना पुढे न जाण्याचं आणि परत जाण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांची ही विनंती धुडकावून लावली.
सुरक्षेची चिंता
पोलिसांनी ताफा अडवताच उद्धव ठाकरे हे कारच्या बाहेर आले. त्यांनी पोलिसांशी संवाद साधला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड समोर शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कंटेनेरमधील शाखेला घेराव घातला आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका. आम्हाला तुमच्या सुरक्षेची चिंता आहे, असं पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांची विनंती अमान्य केली. तुम्ही प्लीज समजून घ्या. वातावरण तंग करू नका. मी फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि परत येतो. काही होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमची अडचण समजू शकतो
तुमची अडचण समजू शकतो. तुम्ही त्यांना आवरा. आम्ही शाखेत जातो आणि मग परत येतो. माझं प्रॉमिस आहे. मी खोटं काम करतोय का? तुम्ही माझा गुन्हा दाखवा मी जातो. कराळे साहेब तुम्ही चुकीचं करत आहात. आमची पूर्वी तिथे शाखा होती. नंतर कंटेनर आला. तुम्ही आधी कंटेनर उचला, असं उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं.
तुमचा अपमान करणार नाही
महाराष्ट्रासमोर हतबल झाल्याचं दाखवू नका. ही कोण टपोरी लोक आहेत? तुम्ही अडचणीत यावे, तुमचा अपमान व्हावा असं आम्ही करत नाही. तसं वाटलं तर आम्ही आल्या पावली परत जातो. मी चालत येऊ का?, असं त्यांनी म्हटलं.