पोलीस म्हणतात, उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही; ठाकरे येण्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं
मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसर येथे 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा बुलडोझर लावून पाडल्यानंतर या शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येत आहेत. सायंकाळी 4वाजता उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करणार असून मुंब्रावासीयांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत. पण त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ठाण्यातील वातावरण अधिकच तापलं आहे.
गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत. दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतील. त्यानंतर 4 वाजता ते मुंब्र्यात पोहोचतील. यावेळी ते स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याने मुंब्र्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्र्यात आणि मुलुंड टोलनाक्यावर हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, मुंब्र्यातील होर्डिंग्ज अज्ञात व्यक्तींनी फाडल्याने ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
दरम्यान, उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला पोलिसांचाच आक्षेप असल्याचा मोठा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे. मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती.
यावर त्यांनी,असे काहीही होणार नाही, आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे, असं मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. आज दूपारी उद्धव ठाकरेंचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते. यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे @OfficeofUT यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती.
यावर त्यांनी,”असे काहीही… pic.twitter.com/aDZ9duct4z
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 10, 2023
मुद्दई लाख बुरा चाहे…
एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात. आणि ‘सर्वत्र नजर असणाऱ्या’ पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!, असा दावाही या ट्विटमध्ये आव्हाड यांनी केला आहे. असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि ठाणे शहर पोलिसांचे आभार मानतो. ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत, असा चिमटा काढतानाच “मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.