तर संयमातील ‘स’ गेल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातून डरकाळी

| Updated on: Nov 11, 2023 | 7:57 PM

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही. ठाणेकर तगडे आहेत. त्यांना गद्दारी चालणार नाही. आनंद दिघे यांचा गुरुमंत्र त्यांना माहीत आहे. डिसेंबर किंवा जानेवारीत माझी ठाण्यात सभा होईल. महाविकास आघाडीचीही सभा घेऊ, असं सांगतानाच ज्या ठिकाणी चोरांची गुंडागर्दी होईल तिथे एकजूटीने उभे राहा, असं माझं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर संयमातील स गेल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातून डरकाळी
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : पोलिसांनी मुंब्र्यात भाडोत्री गुंडांना प्रवेश द्यायला नको होता. त्यांना संरक्षण द्यायला नको होतं. ज्यांचं अकलेचं दिवाळं निघालं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील दिवाळी खराब होऊ नये म्हणून आम्ही संयम पाळला. पण याचा अर्थ असा नाही की दरवेळी आमच्याकडून संयम आणि तुमच्याकडून यम असं होणार नाही. दरवेळी तुम्ही तसं वागणार असाल तर आमच्या संयमातील स गेल्याशिवाय राहणार नाही. परत सांगतो. पोलिसांना बाजूला ठेवा. जे व्हायचं ते होऊ द्या, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात आले होते. मुंब्य्रात शिवसेनेची शाखा तोडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यात येऊन मीडियाशी संवाद साधला. याच सरकारने आज पोलिसांना चोरांचं रक्षण करायला लावलं. त्यामुळे पोलिसांची मानसिकता काय झाली असेल याचा विचार न केलेला बरा. कुणाला कसं वागवायचं हे पोलिसांना कळतं, त्याच लोकांना पोलिसांना संरक्षण द्यावं लागलं. त्यामुळे पोलिसांची मानसिकता काय झाली असेल हे तुम्हाला कळलं असेल. यांना सत्तेचा माज आला आहे. हे नामर्द आहेत. नेभळट आहेत. सत्तेचा आधार घेऊन काहीही करत आहेत, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

डबडं अधिकृत आहे काय?

25 वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. ती पाडली. त्यांनी डबडं आणून ठेवलं आहे. आमच्याकडे कागदपत्र आहेत. आमची शाखा अनधिकृत असेल तर त्याच ठिकाणी जे डबडं ठेवलं ते काय आहे? ते डबडं अधिकृत कसं? तिथेच शिवसेनेची शाखा सुरू आहे. निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार असेल. पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार नाही. शिवसेना आमची आहे. एकच आहे. शिवसेनेची शाखा तिथेच राहील, असंही त्यांनी ठणकावलं.

म्हणून आम्ही थांबलो

तुम्हाला जर ते डबडं हटवता येत नसेल आणि गुंडांना बाजूला करता येत नसेल तर पोलिसांना नम्रपणाने सांगतो, तुम्ही बाजूला व्हा आम्ही बघतो काय करायचं ते. पोलीस त्यांचं संरक्षण करणार असतील, आमच्यावर दंडुके चालणार असतील तर गद्दारांना कळलं पाहिजे त्यांचं राजकीय आयुष्य अल्प राहिलं आहे. ते थोड्यावेळापुरते आहेत. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे. बॅरिकेड्स तोडून आम्हीही गेलो असतो. दिवाळीत काही होऊ नये म्हणून आम्ही थांबलो, असंही ते म्हणाले.

सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही

ज्या ठिकाणी शाखा होती तिथेच नव्याने शाखा उभी राहील. तुम्ही तिथून ते डबडं उचला. आम्ही कोर्टात गेलोच आहे. हे कंटेनरवाले आहेत. त्यांचा कंटेनर रिकामा झाला म्हणून त्यांनी इथे आणला असेल, असं सांगतानाच शिवसैनिकांनो, काळजी करू नका आम्ही मजबुतीने तुमच्या सोबत आहोत. यांचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

कसला ताप माहीत नाही

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारावरही प्रतिक्रिया दिली. माझा अजितदादांशी काहीच संपर्क नाही. त्यांना कसला ताप आहे माहीत नाही. सहकाऱ्याचा ताप आहे का मनस्ताप आहे माहीत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.