याद राखा… मधमाशाच्या पोळावर दगड मारला तर…; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे यांनी ललकारले
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याणच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी हितगूज केलं. तसेच त्यांना मार्गदर्शनही केलं.
कल्याण | 13 जानेवारी 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिंदे गट आणि भाजपला ललकारले आहे. शिवसैनिकांना डिवचू नका. यादा राखा, मधमाश्याचं पोळं शांत आहे. शांत राहू द्या. दगड मारला तर काय होतं हे येत्या निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे. उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये आले होते. कल्याणच्या देसाई गावातील शिवसेना शाखेला ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधतान उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला.
भाजपला सांगतो, शिवसैनिकांना डिवचू नका. मधमाश्यांचं पोळं असतं. जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं. ते तुम्ही आजपर्यंत घेतलं. पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला तर काय होतं हे येत्या निवडणुकीत दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच तुमच्यातील जिद्द आणि उत्साह कायम ठेवा. गद्दारांन गाडा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.
कल्याणची चिंता नाही
कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांना म्हटलं आहे की. मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला निघालो आहे. काल मोदी राज्यात आले. ते परत येणार आहेत. उद्या संक्रात आहे. तिळगुळ वाटप आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रात येणार आहे हे नक्की आहे. या शाखेचं एक महत्त्व आहे. ही जुनी शाखा आहे. सीताराम भोईर यांचं हे गाव आहे. तब्येत बरी नाही म्हणून आले नाही. एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलं आहे. त्यामुळे उद्या काय होणार कल्याणमध्ये काय होणार याची मला चिंता नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्या शिंदे गटालाही फेकून देतील
भाजपचा घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील. वापरा आणि फेका हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार उद्या हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार आहेत. नाही गेले तर आपण आहोतच त्यांना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. ही माझी शाखा भेट आहे. अनेक महिने मनात होतं. कल्याणला भेट द्यायची. आज नुसती भेट आहे. शाखा जुनी आहे. त्याचं नवनिर्माण आहे. शाखेतून कचरा काढून टाकला. नव प्राणप्रतिष्ठा केली. काल मोदींनी फाईव्ह स्टार साफसफाई केली. कार्पेट साफ केलं. साफसफाई महाराष्ट्र करणार आहे, महाराष्ट्र भाजपला केराच्या टोपलीत टाकणार आहोत. हे करणारचं. राम प्रतिष्ठापणनेच्या निमित्ताने तशी शपथच घ्या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.
आपलीच शिवसेना खरी
यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कोणी कुठे गेले? कोणी बिळात गेले. पण जे आज उद्धव ठाकरेंच्या स्वागतला आले ते खरे शिवसैनिक. हा कल्याण मतदारसंघ कोणाची जहांगीर नाही. इथे फक्त आपला भगवा शुद्ध झेंडा फडकणार आहे. न्याय सुद्धा आज विकत घेतला जातोय. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा हे गोधडीत सुद्धा नव्हते आणि हे म्हणातात आम्ही बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपलीच आहे, असं संजय राऊत म्हणाले.