नॅशनल पार्कमधील नदीला पूर, उल्हास नदीही ओव्हर फ्लो, मुंबई भोवतीच्या नद्या तुडूंब
पाऊस जर असाच सुरु राहिला तर पुढचे काही तास हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आव्हानाचे राहतील. सुदैवाने पाऊस थांबला तर पावसाचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल.
मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात तर पावासाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही भागात घरांमध्ये, सोसायटीत तर कुठे चाळींमध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. शहराशहरांमध्ये रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी बघायला मिळतंय. ठाण्याच्या शिळफाटा किंवा मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही महामार्गांवर दरड कोसळल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. पावसामुळे मुंबई भोवतीच्या जवळपास सर्वच नद्या तुडुंब वाहताना दिसत आहेत. पाऊस जर असाच सुरु राहिला तर पुढचे काही तास हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आव्हानाचे राहतील. सुदैवाने पाऊस थांबला तर पावसाचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल.
मुंबईच्या नॅशनल पार्कमधील नदीला पूर
मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आल्याची माहिती समोर आली आहे. पुरामुळे ही नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमधील वस्ती आणि कार्यालयात देखील पाणी शिरलं आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर प्रशासनाला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल. पण पाऊस थांबला तर पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय मुंबईतील दुसरी महत्त्वाची मानली जाणारी पोईसर नदीच्याही पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिमेतील मैदानातही मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
बदलापूरची चौपाटी उल्हास नदीच्या पाण्याखाली
मुंबईजवळ असणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरातदेखील गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदी ही पुणे आणि रायगड जिल्ह्यातून वाहत येऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. कर्जतहून बदलापूर आणि पुढे कल्याणकडे ही नदी वाहत जाते.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही नाही. उल्हास नदीला जर पूर आला, तर बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.
अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. या नदीला मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते.
या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे वालधुनी नदीला शिव मंदिर परिसरात रौद्ररूप आल्याचं पाहायला मिळतंय.
संबंधित बातम्या :
Mumbai Rains Live Updates | बोरिवली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्ते जलमय