उल्हासनगरमध्ये अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यास विरोध, स्थानिकांनी प्रशासनाने खोदलेला खड्डा बुजवला
बदलापूर अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास प्रचंड विरोध होत आहे. पोलिसांकडून बदलापूर, अंबरनाथ, कळवा येथे अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यासाठी जागा शोधली जात होती. अखेर पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथे असलेल्या स्मशानभूमीत अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यासाठी जागा निवडली. तिथे पोलिसांकडून अक्षयच्या मृतदेहासाठी खड्डाही खोदण्यात आला होता. पण उल्हासनगरच्या स्थानिकांनी तिथे येत प्रचंड रोष व्यक्त करत विरोध केला. यावेळी स्थानिकांनी अक्षयच्या दफनविधीसाठी खोदलेला खड्डाही बुजवला.
बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर आता त्याचा दफनविधी वादात सापडला आहे. अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर प्रकरण वादात असल्याने कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे भविष्यात पुराव्यांची आवश्यकता लागू शकते. त्यामुळे अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दहन करण्याऐवजी दफन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण अक्षय शिंदे याच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार अक्षय शिंदे याच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी जागा शोधत आहे. पण ठिकठिकाणी स्थानिकांच्या होणाऱ्या विरोधामुळे अक्षयच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळणं कठीण होऊन बसलं आहे. प्रशासनाने उल्हासनगर येथे अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी जागा शोधली होती. पण तिथे देखील स्थानिकांनी विरोध केलाय. विशेष म्हणजे स्थानिकांनी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी खोदलेला खड्डाच बुजवला आहे. त्यामुळे प्रशासनापुढच्या अडचणी वाढल्या आहेत. अक्षयचा मृत्यू होऊन आता सहा दिवस झाली आहेत, तरीही त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्यामुळे प्रशासनापुढील आव्हान वाढत आहे.
उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. पण तिथे शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि इतर स्थानिक महिला जमल्या. त्यांनी अक्षयचा मृतदेह इथे दफन केला जाऊ शकत नाही, असं म्हणत विरोध केला. यावेळी महिलांनी अक्षयच्या दफनसाठी खोदलेला खड्डा बुजवला. महिला आक्रमक झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण महिलांनी खड्डा बुजवला. या आंदोलनात तृतीयपंथी देखील सहभागी झाले होते.
महिलांनी व्यक्त केला प्रचंड रोष
खरंतर अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलीस बदलापूर, अंबरनाथ, कळव्यासह सर्वच ठिकाणी जागेचा शोध घेत होते. अखेर उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदे यांच्या अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त स्मशानभूमीत करण्यात आला होता. अक्षय शिंदे याच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी खड्डाही खोदण्यात आला होता. पण तो खड्डा विरोध करणाऱ्या स्थानिकांनी बुजवला. यावेळी महिलांनी रोष व्यक्त केला. अक्षय शिंदे हा बदलापूरचा राहणारा असून त्याला बदलापुरात पुरा, अशी भूमिका स्थानिक महिलांनी मांडली. उल्हासनगरच्या शांतीनगर येथील दफनभूमीत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. पण स्थानिकांनी त्यास विरोध केला.
संतप्त महिलांची प्रतिक्रिया काय?
“आमच्या स्मशानभूमीत त्याला जागा मिळणार नाही. त्याला नाल्यात टाका, कुत्रा, मांजराला खाऊ द्या. पण आमच्या उल्हासनगरला त्याला दफनासाठी जागा मिळू देणार नाही”, अशी प्रतिक्रिया एका संतप्त महिलेने दिली. “आमच्या स्मशानभूमीत नाही. त्याला तिकडे कुठेही फेका. नदीत फेका, कुठेही फेका. पण आमच्या परिसरात करु देणार नाही. तुमच्या परिसरात करत नाहीत. मग आमच्या परिसरात कसं करु देणार?”, अशी भूमिका दुसऱ्या एका आंदोलक महिलेने दिली.