Ambernath School: अंबरनाथमध्ये अनोखी ‘गणित प्रयोगशाळा’; 1977 मधील विद्यार्थ्यांची महात्मा गांधी विद्यालयाला ‘गुरुदक्षिणा’
महात्मा गांधी विद्यालयाच्या 1977 सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन काही दिवसांपूर्वी झाले होते. यावेळी शाळेत आधुनिक गणित कक्ष उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. या कक्षाला गणित प्रयोगशाळा असे नाव देण्यात आले आहे. याचा पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
अंबरनाथ : अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात ‘गणिताची प्रयोगशाळा’ उभारण्यात आली आहे. 1977 मध्ये या विद्यालयातून पासआऊट झालेल्या बॅचने ही अनोखी प्रयोगशाळा उभारून एक अनोखी ‘गुरुदक्षिणा’ दिली आहे. विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटू नये, हा विषय सोपा जावा आणि गणिताबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने ही अनोखी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत नेमके काय आहे?
विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत गणिताच्या संज्ञा, प्रमेय, सूत्रे आणि समीकरण अधिक स्पष्ट करून सांगणारी उपकरणे पाहता येईल. त्रिकोणातील तिन्ही कोनांची बेरीज 180 कशी येते, हे त्यांना पडताळून पाहता येईल. या प्रयोगशाळेत जुन्या काळातली परिमाणं, पायली, शेर, सव्वाशेर, मण तसेच सध्या वापरात असलेली लीटर, ग्रॅम, किलो अशी परिमाणं विद्यार्थ्यांना पाहता येतील. इथे असलेल्या विविध भौमितीक आकृत्यांमुळे विद्यार्थ्यांना गणित विषय मनोरंजक पद्धतीने शिकता येऊ शकणार आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या प्रयोगशाळेत सुसज्ज डिजिटल बोर्डसुद्धा असून टच स्क्रीनद्वारे विद्यार्थी त्यावर कोणतंही गणित सोडवू शकणार आहेत.
प्रयोगशाळेसाठी जवळपास 6 लाखांचा खर्च
महात्मा गांधी विद्यालयातून 1977 साली पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेला स्वखर्चाने ही गणित प्रयोगशाळा उभारून दिली आहे. यासाठी 5 लाख 66 हजार रुपये खर्च आला. याच बॅचचे दिवंगत माजी विद्यार्थी भरत करमरकर यांच्या नावाने थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा गणित कक्ष शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे 1977 सालच्या बॅचला गणित शिकवणारे आणि तब्बल 22 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले गणिताचे शिक्षक पी. के. चौधरी सर यांच्या हस्ते या गणित कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिवंगत भरत करमरकर यांच्या पत्नी उपस्थित होत्या. गणित प्रयोगशाळेला आपल्या पतीचे नाव दिल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची भावना भरत करमरकर यांच्या पत्नी स्नेहल करमरकर यांनी व्यक्त केली.
स्नेहसंमेलनातून पुढे आली अनोखी संकल्पना
महात्मा गांधी विद्यालयाच्या 1977 सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन काही दिवसांपूर्वी झाले होते. यावेळी शाळेत आधुनिक गणित कक्ष उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. या कक्षाला गणित प्रयोगशाळा असे नाव देण्यात आले आहे. याचा पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेली ही गुरुदक्षिणा खरोखरच वाखाणण्याजोगी असून त्याचा सध्याच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असा विश्वास माजी मुख्याध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मराठी शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि इतर गोष्टींचे ज्ञान यामुळे सध्याच्या काळात इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत चाललाय. मात्र अशात मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे असे उपक्रम येत्या काळात नक्कीच महत्त्वाचे ठरतील. (Unique Mathematics Laboratory at Mahatma Gandhi Vidyalaya in Ambernath)
इतर बातम्या
तो आला… त्याने नाव नोंदवलं… अन् लस न घेताच पळून गेला; काय चाललंय काय डोंबिवलीत?