मुंब्रा बायपास रस्त्यावर एक एप्रिलपासून वाहनांना बंदी, असा केलाय बदल ?
पुलाचे दुरुस्तीचे काम किती चालणार आहे, याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर पूल काम झाल्यानंतर किती दिवस बंद ठेवणार हे सुद्धा अद्याप जाहीर केलेले नाही.
निखिल चव्हाण, ठाणे : मुंब्रा बायपास (Mumbra Bypass Rd) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. जेएनपीटी (JNPT), कळंबोलीकडून भिवंडी, नाशिक, गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपास बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्या मार्गावरून येणारी जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत १ एप्रिलपासून (1 april) बदल करण्यात आले आहेत.
पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचं काम होणार
तर ही वाहतूक ठाणे शहरअंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंब्रा बायपास मार्गे जेएनपीटी, कळंबोली नवी मुंबईकडून भिवंडी, नाशिक, गुजरातकडे राज्य महामार्ग क्र ३ अथवा घोडबंदर रोडने जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मुंब्रा बायपास रेतीबंदर जवळील मुंब्रा कौसा बायपास रस्ता मधील रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचं काम करण्यात येणार आहे. तसेच खारेगाव व साकेत पुलाचे मास्टीक पध्दतीने डांबरीकरण व क्षतिग्रस्त एक्सपांशन जॉईंट्स दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग अद्याप जाहीर…
पुलाचे दुरुस्तीचे काम किती चालणार आहे, याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर पूल काम झाल्यानंतर किती दिवस बंद ठेवणार हे सुद्धा अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे १ एप्रिलपासून त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांना वेगळ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. अद्याप पर्यायी मार्ग प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर तिथं अधिक दिवस काम चालणार असल्याचे सांगितले जात आहे.