एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू, अपमान कुणी केला? मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं?; केसरकर यांचा दोन दिवसात खुलासा
जे झोपतात ते फक्त स्वप्न पाहतात. म्हणूनच आजकाल बरेच लोक स्वप्न पाहतात. आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करत राहतो, असा चिमटा त्यांनी काढला.
ठाणे: शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांना त्यांचा मान मिळेल असं वाटलं होतं. पण त्यांचा अपमान करण्यात आला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे का? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं? याचा दोन दिवसात खुलासा करणार आहे, असा इशाराच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना नाव न घेता इशारा दिला आहे. त्यामुळे केसरकर आता काय नवा गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. कलम 370 काढणे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते.
भाजपने हा स्वप्न पूर्ण केलं. पण हे कलम रद्द करण्यास काँग्रेसने विरोध केला. 370 कलमाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेच्या नेत्यांनी भेटणे हा बाळासाहेब ठाकरेंचा मोठा अपमान आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.
बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही
शिवसेनेत आम्ही बंड केलं. त्यानंतर आम्ही कुठेही जायचो तेव्हा गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छता केली जायची. आता त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यावर गोमूत्र टाकून स्वच्छता करावी, असा टोला लगावतानाच जे सत्तेसाठी काँग्रेसच्या पायाला हात लावतात, जे सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या मागे धावतात, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल केसरकर यांनी चढवला.
बरेच लोक स्वप्न पाहतात
काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे झोपतात ते फक्त स्वप्न पाहतात. म्हणूनच आजकाल बरेच लोक स्वप्न पाहतात. आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करत राहतो, असा चिमटा त्यांनी काढला.
आझमींनी घाबरून जाऊ नये
सपा नेते अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत सर्वजण सुरक्षित आहेत. अबू असीम आझमी यांच्या धमकीबाबत जो काही निर्णय घ्यावा लागेल, तो मुंबई पोलीस घेईल. त्यांना घाबरण्याचे कारण नाही. मी स्वतः मुंबईच्या आयुक्तांशी बोलेन. आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही पोलीस आयुक्तांशी बोलतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.